![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/01/8th-pay-commission-ac-1.jpg?width=380&height=214)
आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) गठीत करण्यासाठी केंद्र सरकारने मंजूरी तर दिली. त्यामुळे केंद्र सरकारी सेवेत असलेल्या विद्मान आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये (Central Government Employees) आनंदाचे भरते आले आहे. फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor), वेतनवाढ (Salary Hike), निवृत्तीवेतन (Pension Revision), महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि इतर अनेक लाभ घेण्यासाठी हे कर्मचारी अतूर झाले आहेत. असे असले तरी या आयोगाचे काम अद्याप तरी सुरु झाले नाही. त्यामुळे त्याचे काम नेमके सुरु होणार तरी केव्हा याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आहे. अशा वेळी केंद्र सरकारच्या वित्तीय खर्च विभागाचे सचिव मनोज गोविल (Manoj Govil) यांनी या कर्मचाऱ्यांची उत्सुकता फारशी ताणून न धरता काम नेमके केव्हा सुरु होणार याबाबत माहिती दिली आहे.
कर्मचाऱ्यांच्या लाभाबाबत स्पष्टता
वित्तीय खर्च विभागाचे सचिव मनोज गोविल यांनी सीएनबीसी-टीव्ही 18 सोबत संवाद साधताना म्हटले आहे की, आठवा वेतन आयोग आर्थिक वर्ष 2025-26 साठी एप्रिल 2025 मध्ये काम सुरु करणार आहे. त्यामुळे हे काम एकदा सुरु झाले की, कर्मचाऱ्यांच्या लाभाबाबत स्पष्टता येऊ शकणार आहे. दरम्यान, हे काम सुरु होणे हे वाटते तितके सोपे, सरळ नाही. त्यासाठीसुद्धा एक विशिष्ट प्रक्रिया असते. या प्रक्रियेचाच भाग म्हणून, केंद्रीय मंत्रिमंडळाने आयोगाचे अधिकृतपणे काम सुरू करण्यापूर्वी प्रथम संदर्भ अटी (ToR) मंजूर कराव्या लागतील. याव्यतिरिक्त, आयोग वेतन आणि पेन्शन सुधारणांचे मूल्यांकन करण्यासाठी कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून सूचना मागवेल. (हेही वाचा, 8th Pay Commission: आठवा वेतन आयोग, कशाच्या आधारावर वाढणार वेतन आणि पेन्शन?)
आर्थिक वर्ष 2026 मध्ये तातडीचा आर्थिक परिणाम नाही
सचिव मनोज गोविल यांनी स्पष्ट केले की, 2026 च्या आर्थिक वर्षासाठी आठव्या वेतन आयोगाचे कोणतेही आर्थिक परिणाम होणार नाहीत. तथापि, पुढील वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात वेतन आणि पेन्शन सुधारणांचा आर्थिक परिणाम सामावून घेण्यासाठी आवश्यक तरतुदी समाविष्ट असतील. शिवाय, सुधारित वेतन रचनेचा भारताच्या एकीकृत पेन्शन योजनेवर (UPS) आणि फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) वर देखील परिणाम होण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा, 8th Pay Commission: काय सांगता? आठवा वेतन आयोग लागू झाल्यास तिप्पट पगार? केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी?)
आठवा वेतन आयोग म्हणजे काय?
केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा आणि पेन्शनचा आढावा घेण्यासाठी आणि सुधारण्यासाठी दर 10 वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते. 1946 पासून आतापर्यंत सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत, ज्यामध्ये 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत नवीनतम सुधारणा 2016 मध्ये लागू करण्यात आली आहे. (हेही वाचा, 8th Pay Commission Salary Hike: आठवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना करणार मालामाल? जाणून घ्या संभाव्य Fitment Factor, वेतनवाढ, पेन्शन सुधारणा)
आठवा वेतन आयोग कशावर लक्ष केंद्रित करेल?
- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढ
- महागाईशी सुसंगत महागाई भत्ता (डीए) समायोजन
- निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन सुधारणा
दरम्यान, केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी अद्याप पगारवाढीची अचूक टक्केवारी जाहीर केलेली नसली तरी, अहवाल असे सूचित करतात की किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरुन वाढून ते तब्बल 51,480 रुपयांवर पोहोचू शकते.
आठव्या वेतन आयोगाचा फायदा कोणाला होईल?
मिंटने दिलेल्या अहवालानुसार आठवा वेतन आयोग संरक्षण कर्मचाऱ्यांसह सुमारे 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा आहे. या आयोगामध्ये महागाई, भत्ते आणि इतर अनेक बाबींचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.