Thunderstorms in Bihar: बिहारमध्ये वीज पडून तब्बल 83 लोकांचा मृत्यू; पीएम नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दुःख, सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत जाहीर
Thunderstorm in Uttar Pradesh (Image used for representational purpose only) (Photo Credits: ANI)

सध्या भारत कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाशी लढत असताना बिहारमध्ये (Bihar) एक नवे संकट कोसळले आहे. बिहारमध्ये गुरुवारी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व वादळामुळे (Thunderstorms) मोठ्या प्रमाणात विनाश झाला. अशात बिहारमध्ये वीज कोसळल्याने तब्बल 83 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातही वीज कोसळल्याने किमान 9 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील 23 जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने ही मानवी हानी झाली आहे. सर्वाधिक मृत्यू गोपाळगंजमध्ये झाले असून, तिथे 13 लोक मरण पावले आहेत. तर मधुबनी आणि नबादा येथे 8-8 लोकांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमध्ये असे 8 जिल्हे आहेत जिथे किमान 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. गोपाळगंज, पूर्व चंपारण, सिवान, बांका, दरभंगा, भागलपूर, मधुबनी व नबादा हे जिल्हे आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार 25 जून (गुरुवारी) सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत, 83 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून फोनवर मिळालेल्या माहितीच्या आधारे ही यादी जाहीर करण्यात आली आहे. बिहार सरकारने सर्व मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. दरम्यान, हवामान खात्याने बिहारसाठी 72 तासांचा अलर्ट जारी केला आहे. येत्या 72 तासांत बिहारमध्ये मुसळधार पावसासाठी हवामान खात्याने गुरुवारी सतर्कतेचा इशारा दिला.

खराब हवामानात जनतेने पूर्ण सावधगिरी बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने विजेचा प्रतिबंध करण्यासाठी जारी केलेल्या सूचनांचे अनुसरण करा, पावसाळ्यात घरामध्येच राहा किंवा सुरक्षित ठिकाणी रहा, असेही सांगण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी लोकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्वीटद्वारे आपले दुःख व्यक्त केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, ‘बिहार आणि उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट झाला, त्यामध्ये अनेकांचे मृत्यू झाल्याची दु: खद बातमी मिळाली. राज्य सरकार तातडीने मदत कार्यात व्यस्त आहेत. या आपत्तीत ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटूंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो.’ (हेही वाचा: भाजप नगरसेवक मनोहर शेट्टी पावसाचे तुंबलेले पाणी उपसून काढण्यासाठी उतरले गटारात, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव (See Photos))

दरम्यान, हवामान खात्याचे ज्येष्ठ वैज्ञानिक आरके जेनामानी यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील उप-हिमालयी प्रदेशात मुसळधार पाऊस पडणार आहे. यामुळे पूर येण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारांना कळविले आहे.