7th Pay Commission: देशभरातील केंद्रीय कर्मचार्‍यांना मोदी सरकार लवकरच देणार पगारवाढ; 10,000 रूपयांपर्यंत होऊ शकते वाढ
7th Pay Commission (File Image)

7th Pay Commission News Updates: भारतामधील लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांना मोदी सरकारकडून लवकरच पगारवाढीची गूडन्यूज मिळणार आहे. सामान्यपणे केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ दिली जाते. यंदा सराकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यामध्ये (DA)  सुमारे 4% वाढ होऊ शकते त्यामुळे लवकरच त्याचा फायदा देशभरातील लाखो सरकारी कर्मचार्‍यांना होऊ शकतो. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 17% असून त्यामध्ये 4% वाढ म्हणजे 21% होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 7th Pay Commission:रेल्वे कर्मचार्‍यांसाठी 2019 वर्ष ठरलं लाभदायी; पगारात झाली 'इतकी' दमदार वाढ.

भारतामध्ये जुलै 2019 ते ऑक्टोबर 2019 या काळात महागाईचा आकडा 3 पॉंईंटने वधारला त्यामुळे डीएमध्ये 4% वाढ म्हणजेच एकूण पगारात अंदाजे 720 ते 10,000 रूपये वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान कर्मचार्‍यांच्या पे स्केल आणि विविध राज्यांप्रमाणे पगाराचं स्वरूप आणि त्यामध्ये होणारी वाढ ही वेगवेगळी असू शकते.

डीएच्या वाढीसोबतच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, किमान वेतन देखील वाढवण्याची केंद्रीय कर्मचार्‍यांची मागणी आहे. यासोबतच फीटमेंट फॅक्टरदेखील बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या वर्षात मोदी सरकार देशभरातील लाखो कर्मचार्‍यांना आणि पेंशन धारकांना मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे.

जुलै 2019 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांना सर्वाधिक म्हणजे महागाई भत्त्यामध्ये 5% वाढ देण्यात आली होती. आता सरकार जानेवारी 2020 मध्ये किती टक्के डीए वाढवणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. येत्या 1 फेब्रुवारी दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत.