Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची (Dearness Allowance) प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. लवकरच सरकार याबाबत घोषणा करून, तो जारी करेल. सरकारकडून महागाई भत्त्याची अधिकृत घोषणा 28 सप्टेंबरला म्हणजेच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी केली जाण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता सप्टेंबर महिन्याच्या पगारासह दिला जाईल. यादरम्यान कर्मचाऱ्यांना जुलै-ऑगस्टच्या डीए थकबाकीचाही लाभ मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढेल यासाठी सरकार AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker ) डेटा वापरते. AICPI-IW च्या पहिल्या सहामाहीची आकडेवारी जाहीर झाली आहे. जूनमध्ये निर्देशांक 129.2 वर पोहोचला आहे. निर्देशांकात वाढ झाल्यामुळे डीएमध्ये 4 टक्के वाढ निश्चित आहे. एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या वाढीचा लाभ मिळणार आहे. (हेही वाचा: Free Ration: आणखी 3 ते 6 महिन्यांपर्यंत मिळू शकते मोफत अन्नधान्य; PMGKAY ची मुदत वाढण्याची शक्यता)

महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्के झाला आहे. वाढलेला महागाई भत्ता सप्टेंबर 2022 च्या पगारात दिला जाईल. नवीन महागाई भत्ता 1 जुलै 2022 पासून लागू होईल. अशा स्थितीत जुलै आणि ऑगस्टच्या थकबाकीचाही यात समावेश होणार आहे. सध्या सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्के झाल्याने पगारात लक्षणीय वाढ होणार आहे.