
जर तुम्ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. केंद्र सरकार ही योजना आणखी काही दिवस वाढवण्याचा विचार करत आहे. सरकारने मोफत रेशन योजनेची मुदत वाढवली तर, या योजनेचा लाभ घेणाऱ्या देशातील 80 कोटी लोकांना त्याचा फायदा होईल. या योजनेचा कालावधी 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. वृत्तानुसार, सरकार आणखी तीन ते सहा महिने ही योजना वाढवू शकते.
उच्च महागाई, भू-राजकीय अनिश्चितता आणि चीनमध्ये येऊ घातलेल्या मंदीमुळे जागतिक पुरवठा साखळी आणखी विस्कळीत होऊ शकते, यामुळे सरकार भारतातील 800 दशलक्ष गरिबांना 30 सप्टेंबरच्या अंतिम मुदतीनंतरही आणखी 3-6 महिन्यांसाठी मोफत रेशन देणे सुरू ठेवू शकते. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना एप्रिल 2020 मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता, त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. म्हणूनच ही योजना सुरु करण्यात आली होती.
या योजनेची मुदत मार्चमध्ये सहाव्यांदा वाढवण्यात आली. आता ही योजना पुढील महिन्यात संपत आहे, त्यामुळे ती आणखी वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. या संदर्भात इंग्रजी वेबसाइट हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे. प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसाठी सरकारकडे अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा जगातील सर्वात मोठा अन्न सुरक्षा कार्यक्रम आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने अलीकडेच स्टॉक स्थितीचा आढावा घेतला आहे, त्यानंतर ही योजना पुढे नेण्याचा विचार केला जात आहे. (हेही वाचा: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरचं मिळणार खूशखबरी; 18 महिन्यांची DA/DR थकबाकी मिळण्याची शक्यता)
PMGKAY लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत त्यांच्या सामान्य अन्नधान्याच्या कोट्याव्यतिरिक्त दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत रेशन मिळते. NFSA नुसार, देशातील सुमारे 75% ग्रामीण आणि 50% शहरी लोकसंख्येला सरकारकडून उच्च अनुदानित अन्नधान्य पुरवले जाते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमुळे, महामारी दरम्यान पैसे उधार घेण्याची शक्यता 67% कमी केली.