भारत 15 ऑगस्ट रोजी आपला 78 वा स्वातंत्र्यदिन (78th Independence Day) साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा देशवासीयांना संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्यदिनादिवशी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करण्याची ही अकरावी वेळ असेल. सलग 11 वेळा देशाला संबोधित करणारे जवाहरलाल नेहरू यांच्या नंतरचे ते दुसरे पंतप्रधान असतील, तर 11 वेळा स्वातंत्र्यदिनाचे भाषण देणारे ते तिसरे पंतप्रधान असतील.
यंदाच्या स्वातंत्रदिनाच्या आपल्या भाषणात पीएम मोदी देशासमोर सरकारचे प्राधान्यक्रम मांडू शकतात, तसेच भारताला विकसित देश बनवण्याचा रोड मॅपही देऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनासाठी गरीब, तरुण, अन्नदाता (शेतकरी) आणि महिला या चार वर्गांच्या प्रतिनिधींना खास आमंत्रित करण्यात आले असून, हे सर्व लोक लाल किल्ल्यावर उपस्थित राहणार आहेत.
या चार श्रेणीतील सुमारे चार हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पाहुण्यांची 11 श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. शेतकरी, तरुण आणि महिला पाहुण्यांना आमंत्रित करण्याची जबाबदारी कृषी आणि शेतकरी कल्याण, युवा कार्य, महिला आणि बालविकास मंत्रालयांना देण्यात आली आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंनाही आमंत्रित केले जाऊ शकते, असे सूत्रांकडून समजते. अहवालानुसार, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात एकूण 18 हजारांहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. (हेही वाचा; Is It The 77th Or 78th Independence Day? भारतात 15 ऑगस्ट रोजी कितवा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार, जाणून घ्या)
अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे लोकांना, ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. दरम्यान. 15 ऑगस्टपूर्वी दिल्लीतील सर्व भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा स्थळांवर सैनिक तैनात करणे, वाहनांची तपासणी करणे, ड्रोनद्वारे नजर ठेवणे अशा प्रकारे दिल्ली पोलीस सतर्क आहेत. या दिवशी कोणतीही दुर्घटना घडू नयते म्हणून दिल्ली पोलीस प्रत्येक ठिकाणी सुरक्षेची विशेष काळजी घेत आहेत.