आई-मुलाच्या नात्याला काळिमा; 50 वर्षीय व्यक्तीने आईचे नग्न फोटो पाठवले नातेवाईकांच्या WhatsApp ग्रुपवर, प्रॉपर्टीसाठी करत होता ब्लॅकमेल
WhatsApp (Photo Credits: Lifewire)

लोक संपत्तीच्या वादातून कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. संपत्तीच्या वादातून भांडण, मारामारी अशा गोष्टी आपण पहिल्या असतील, मात्र याच मुद्द्यावर राजस्थानच्या (Rajasthan) कोट्यातून (Kota) एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. वडिलांची मालमत्ता प्राप्त करताना, दबाव आणण्यासाठी एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या वयोवृद्ध आईची नग्न छायाचित्रे व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केली आहेत. या व्यक्तीचे नाव दीपक तिवारी (Deepak Tiwari) असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 509 ए, 509 बी आणि आयटी कायद्याच्या कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. या पिडीत महिलेचे वय 75 वर्षे इतके आहे. या प्रकरणात दिपकला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (एसीजेएम) न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दादाबाड़ी पोलिस स्टेशन प्रभारी ताराचंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या पतीचे 20 दिवसांपूर्वी निधन झाल्यानंतर मालमत्तेचा वाद सुरू झाला होता. (हेही वाचा: गुजरातमधील IAS अधिकाऱ्यांच्या Whatsapp Group मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याने शेअर केले आपले Nude Photo)

मिळालेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी 75 वर्षीय आईने पोलिसात तक्रार केली की, ‘मी माझ्या दिवंगत पतीसाठी 13 मे रोजी 'हवन' करीत होते, जेव्हा माझा मुलगा (आरोपी) तिथे आला आणि त्याने माझ्यावर काहीतरी शिंपडले व त्यामुळे मला खाज सुरु झाली. त्यानंतर अंघोळ करून मी कपडे बदलत असताना दिपकने आक्षेपार्ह फोटो क्लिक केले. आरोपी मुलाने ती छायाचित्रे त्यांच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविली.’ नातेवाईकांनी महिलेला याबद्दल सांगितले असता महिलेने पोलिसांकडे संपर्क साधला. यानंतर 16 मे रोजी पोलिसांनी दीपकला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराची मालकी घेण्यास दबाव आणण्यासाठी दीपकने त्याच्या आईला ब्लॅकमेल आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केला.