कितीही कडक कायदे केले, जनजागृती केली तरी स्त्रियांवरील अत्याचार कमी होत नाहीत. मंगळवारी हिसार (Hisar) जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत, तीन विद्यार्थिनींनी आपल्यावर झालेल्या लैंगिक छळाचे (Sexual Harassment) अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. या शाळेतील मुलींवर चक्क शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केले आहेत. याबाबत शाळेतील तब्बल 40 विद्यार्थ्यांनी बाल संरक्षण युनिटला निवेदन दिले आहे. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सहा महिन्यांपूर्वी वर्गातील एका मुलीचा शिक्षकांनी लैंगिक छळ केला. हा प्रकार सतत सुरु होता, त्यामुळे या छळाला कंटाळलेल्या मुलीने चक्क विष खाल्ले.
याबाबत शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले होते, परंतु यामध्ये सामील असणाऱ्या तीन शिक्षकांवर कारवाई करण्याऐवजी शिक्षण विभागाने हे प्रकरण दाबले. एवढेच नव्हे तर शिक्षकांना इशारा देण्याऐवजी, सरकारी शाळेच्या प्रमुखांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि प्रकरण पुन्हा दडपले. शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि शाळेच्या व्यवस्थापनाने हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यामुळे शाळेत हा लैंगिक छळ असाच सुरु राहिला.
(हेही वाचा: धक्कादायक! इयता सातवीतील विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार; पिडीता गरोदर, आरोपी फरार)
शाळेतील मुलींनी दिलेल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, हे तीनही शिक्षक शाळेच्या वेळेपूर्वी मुलींना बोलावत असत आणि त्यांना अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांचा विनयभंग करीत असत. लॅब किंवा इतर खोल्यांमध्ये या मुलींना घेऊन जाऊन असे कृत्य घडत असे. यावेळी ते मुलींसमोर बीडी-सिगारेटदेखील ओढत असत. जेव्हा मुली यासाठी नकार द्यायच्या तेव्हा शिक्षक त्यांना नापास करण्याची धमकी द्यायचे. आता या मुलींनी दिलेले निवेदन आणि तक्रारीनंतर या तीनही शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, दोन शिक्षकांना अटक झाली आहे.