मोदी सरकारने कामगार संहितेच्या नियमांमध्ये 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टीचा पर्याय ठेवला आहे, परंतु एका आयटी कंपनीने त्याआधीच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू केला आहे. सायबर सिक्युरिटी कंपनी टीएसी सिक्युरिटीजने (TAC Security) कर्मचाऱ्यांच्या चांगल्या उत्पादकतेसाठी गेल्या 7 महिन्यांपासून 4 दिवस कामकाजाचे दिवस (4-Day Working Week) ठेऊन, शुक्रवारी कार्यालय बंद केले आहे. कंपनीने म्हटले आहे की जर असे केल्याने कर्मचाऱ्यांची उत्पादकता चांगली असेल तर कंपनी मुंबई कार्यालयात कायमस्वरूपी 4 दिवस काम करेल. हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हा कंपनीचा भविष्यातील कामाचा मार्ग असल्याचेही सांगितले आहे. कंपनीमध्ये सुमारे 200 कर्मचारी आहेत. हेल्दी वर्क लाइफ आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदी वर्कफोर्स निर्माण करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. एका आयटी कंपनीने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 80% टीम आठवड्यातून 4 दिवस जास्त तास काम करण्यास इच्छुक आहेत. यामुळे त्यांना स्वतःसाठी एक मोठा 3 दिवसांचा विकेंड मिळतो.
टीएसी सिक्युरिटीजचे सीईओ आणि संस्थापक त्रिशनीत अरोरा म्हणाले की, आमच्या कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या कर्मचार्यांचे आरोग्य आणि त्यांचे कल्याण याला पहिले महत्व दिले आहे. ही तरुण लोकांची कंपनी आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीबाबत आम्ही प्रयोग करू शकतो. यामुळे आम्हाला सांघिक कार्यामध्ये संतुलन राखण्यास मदत मिळते. (हेही वाचा: SBI SO Recruitment 2021: एसबीआय मध्ये 606 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती सुरू; पहा कसा कराल अर्ज)
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारदेखील नवीन लेबर कोड नियम लागू करणार आहे. जर हे नियम लागू झाले तर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम करावे लागेल आणि 3 दिवसांची सुट्टी मिळेल. त्याच वेळी, कार्यालयाच्या कामकाजाचे 12 तास होतील.