देशभरात सध्या लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) सुरू आहेत. अशातच चेन्नईच्या तांबरम रेल्वे स्थानकावर नेल्लई एक्स्प्रेस ट्रेनमधून 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेऊन निघालेल्या तिघांना पकडण्यात यश आले आहे. निवडणूकीच्या काळात ही घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यासह (BJP Workers) तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. हे लोक चार कोटी रुपये सहा पोत्यात घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होते आणि हा पैसा लोकसभा निवडणुकीत वापरायचा होता. (हेही वाचा - West Bengal Blast Probe: पश्चिम बंगालमध्ये NIA च्या टीमवर हल्ला, दोन अधिकारी जखमी)
चेंगलपट्टू जिल्हा निवडणूक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार जप्त केलेली रोकड पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठवण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांमध्ये भाजप नेते आणि खासगी हॉटेलचा व्यवस्थापक सतीश, त्याचा भाऊ नवीन आणि चालक पेरुमल यांचा समावेश आहे. सूत्रांनी सांगितले की, सतीशने थिरुनेलवेली येथील भाजपचे लोकसभा उमेदवार नयिनर नागेंद्रन यांच्या टीमच्या सूचनेनुसार काम केल्याची कबुली दिली आहे.
प्राप्तिकर विभाग जप्त केलेल्या रकमेची चौकशी करेल कारण ती 10 लाखांच्या वर आहे. आदर्श आचारसंहितेनुसार निवडणूक काळात 10 लाखांच्या वरील रकमेची चौकशी करावी लागते," असे चेंगलपट्टूचे जिल्हा निवडणूक आयुक्त म्हणाले. "त्यानुसार, जप्तीशी संबंधित सर्व माहिती प्राप्तिकर विभागाला पाठवण्यात आली आहे. त्यानंतर प्राप्तिकर विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करेल," असे अधिकारी म्हणाले.
तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकूण 39 जागा आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला दक्षिण भारतात आपली कामगिरी सुधारायची आहे. दक्षिणेतील एकाही राज्यात भाजपची सत्ता नाही. शिवाय, तामिळनाडूमध्ये काँग्रेस द्रमुकसोबत सरकारमध्ये आहे, तर तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारमध्ये आहे.