Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

जगभरात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) लोण हे झपाट्याने पसरत चालले असून भारताची ही परिस्थिती काही वेगळी नाही. भारतात नवे 1076 रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची संख्या 11,439 वर जाऊन पोहोचली आहे. यात गेल्या 24 तासांत 38 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. हा आकडा खूपच धक्कादायक असून कोरोनाचा कहर संपूर्ण देश सहन करत आहे. ताज्या माहितीनुसार, 11,439 रुग्णांमध्ये 9756 रुग्ण सक्रिय केसेस असून 1306 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर एकूण 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तर महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे एका दिवसात 18 लोकांचा मृत्यू झाला असून, 350 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आतापर्यंत 2 हजार 684 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुळे एकूण 178 लोकांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे हा मृत्युदर (Mortality Rate) संपूर्ण जगात सर्वाधिक असल्याची बाब समोर येत आहे. चिंता वाढली: महाराष्ट्राचा Coronavirus मृत्युदर जगात सर्वाधिक; राज्यात एकूण 178 लोकांचा मृत्यू, तर 2,684 जणांना लागण

भारतामध्ये पहिल्या चार आठवड्यांमध्ये केवळ तीन कोरोना व्हायरस प्रकरणे होती, जी आठव्या आठवड्यात 724 झाली. 11 व्या आठवड्यात यामध्ये 10 पटपेक्षा वाढ होऊन ती 7447 झाली. त्या तुलनेत अमेरिकेचा प्रवास पहिल्या आठवड्यात 11 प्रकरणांसह, 12 व्या आठवड्यात 395,030 पर्यंत पोहचला. इटलीमध्ये पहिल्या आठवड्यात तीन रुग्ण होते, ते दहाव्या आठवड्यात 147,577 इतके झाले. स्पेनमध्ये पहिल्या आठवड्यात एक प्रकरण होते ते 10 व्या आठवड्यात 152,446 वर पोहचले.