धक्कादायक! मोबाईल चार्जिंगला लावताच हातातच झाला स्फोट, रस्त्यावर पडलेली पॉवर बँक वापरणे तरुणाला पडले महागात
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

अनेकदा काही माणसांना रस्त्यात पैसे, एखादी वस्तू दिसली की लगेच उचलायची सवय असते. मात्र हिच सवय एका 28 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतली आहे. लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका तरुणाने रस्त्यावर पडलेली पॉवर बँकसदृश्य वस्तू घरी आणली आणि त्याने मोबाईल चार्जिंगला लावला. मात्र मोबाईल चार्जिंग सुरु करताच त्याच्या हातातच त्याचा स्फोट झाला आणि त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मध्य प्रदेशातल्या चपरोड गावात शुक्रवारी ही घटना घडली आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. मृत राम साहिल पाल हा आपल्या शेताकडे चालला होता.त्यावेळी त्याला रस्त्यावर पॉवर बँक सारखी दिसणारी एक वस्तू सापडली. त्यानंतर काही वेळाने त्याने आपला मोबाईल फोन त्याला जोडला आणि त्यावेळी त्या वस्तूचा स्फोट होऊन राम साहिल पाल याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी पोलिसांना हा घडलेला प्रकार सांगितला.हेदेखील वाचा- UP: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह राप्ति नदीत फेकून देत असल्याच्या व्हिडिओ व्हायरल, गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटनेतील पॉवर बँक सदृश्य गोष्ट तपासणीसाठी पाठवली आहे. जेणेकरुन ती पॉवर बँक होती की आणखी काही ते कळेल. सदर वस्तू स्फोटक नव्हती असेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असल्याचं समोर येत आहे.

याआधी नांदेड, नाशिक, अंबरनाथ, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी मोबाईलच्या स्फोटामुळे मोठी हानी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र वर्षभरापूर्वी  तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील करुरू (Karur) या ठिकाणी मोबाईलचा स्फोट झाल्याने आईसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मोबाईलचा स्फोट झाल्यावर लागलेल्या आगीमध्ये या तिघांचा मृत्यू झाला. रिपोर्ट्सनुसार मोबाईल चार्जिंगला लावला असता त्यामध्ये स्पार्क्स झाले व त्यामुळे आग लागली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे मुले रुग्णालयात नेत असताना दगावली.