परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी आज, शनिवारी अमरावतीमध्ये सांगितले की, भारताने आतापर्यंत 15 देशांना कोविड-19 लस (COVID-19 Vaccine) पुरविल्या आहेत आणि अन्य 25 देश भारतामध्ये तयार होणार्या लसांच्या (Made in India Coronavirus Vaccine) प्रतीक्षेत आहेत. ते म्हणाले की, ‘देशातील तीन प्रवर्गातील लोक लस घेण्यास इच्छुक आहेत- गरीब, किमतींच्या बाबतीत संवेदनशील देश आणि इतर असे देश जे औषध कंपन्यांशी थेट संबंध जोडतात. महत्त्वाची बाब म्हणजे लसीसंदर्भात भारत जगाच्या नकाशावर उदयास आला आहे. काही गरीब देशांना अनुदानाच्या आधारे लस पुरविली जात आहे, तर काही देशांना भारत सरकार लस निर्मात्यांना जी रक्कम देत आहे त्या किंमतीवर लस हव्या आहेत.’
जयशंकर असेही म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला ‘जगाची फार्मसी’ म्हणून स्थापित करू इच्छित आहेत. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, देशात आतापर्यंत 54 लाखाहून अधिक लोकांना कोविड-19 लस देण्यात आली आहे. मंत्रालयाने सांगितले की आतापर्यंत एकूण, 54,16,849 लाभार्थ्यांना लसी देण्यात आली असून, त्यापैकी उत्तर प्रदेशात सर्वात जास्त 6,73,542 लोकांना लस देण्यात आली आहे. यानंतर, महाराष्ट्रात 4,34,943 लोकांना, राजस्थानमध्ये 4,14,422 आणि कर्नाटकात 3,60,592 लसीकरण करण्यात आले आहे. (हेही वाचा: कोविड-19 लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्च महिन्यात सुरु होण्याची शक्यता- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन)
अवघ्या 21 दिवसांत 5 दशलक्षाहून अधिक लोकांना लसी देणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, ‘गेल्या 24 तासात 10,502 सत्रांमध्ये 4,57,404 लोकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 1,06,303 सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत लसीकरण झालेल्यांपैकी 3,01,537 आरोग्य कर्मचारी आणि कोविड19 च्या विरोधात फ्रंट लाईनवर लढणारे 1,55,867 कर्मचारी आहेत. दरम्यान, भारतात कोविड-19 चे नवे 11,713 रुग्ण आढळून आले, त्यानंतर शनिवारी देशभरातील संक्रमणाची एकूण संख्या 1,08,14,304 झाली. आतापर्यंत 1,05,10,796 लोक या आजारापासून बरे झाले आहेत.