Elope (Representative Image) (Photo Credits: Unsplash)

नोएडामध्ये (Noida) एक शिक्षिका (Teacher) आपल्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन विद्यार्थ्याचे वडील विजय शुक्ला यांनी सेक्टर-113 पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर-123 येथील 22 वर्षीय महिला शिक्षक आयेशा आपल्या घरी कोचिंग क्लासेस घेते. या शिक्षिकेच्या घरासमोर हा 16 वर्षांचा मुलगा अनुराग शुक्ला राहतो. हा अल्पवयीन विद्यार्थी याच महिला शिक्षिकेकडे कोचिंगसाठी जात असे. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघेही एकमेकांना पसंत करू लागले.

अचानक एके रविवारी दोघेही घरातून गायब झाले. आयशाने अनुरागला फूस लावून घरातून पळवून नेल्याचा आरोप विजय यांनी केला आहे. मूळ देवरिया येथील रहिवासी असलेल्या मुलाच्या वडिलांनी सेक्टर-113 पोलीस ठाण्यात महिला शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली आहे. वडिलांनी तक्रारीत लिहिले आहे की, रविवारी साधारण दीडच्या सुमारास त्यांचा 16 वर्षीय मुलगा चुलतीच्या घरी जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला, मात्र सायंकाळपर्यंत तो परतला नाही. वडिलांचे म्हणणे आहे की, समोर राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीनेच त्याला फूस लावून पळवून नेले आहे. (हेही वाचा: Lucknow: महागडे गिफ्ट न दिल्याने पत्नी करायची मानसिक छळ, कंटाळून पतीने गाठले पोलिस स्टेशन)

वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाबाबत अतिरिक्त डीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी सांगितले की, सेक्टर-123 मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने कोचिंग शिक्षिकेविरुद्ध आपल्या मुलाला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचेही समोर आले आहे. विविध प्रकारे दोघांचा शोध घेतला जात आहे.