सीबीएसई उद्या दुपारी दहावीचा निकाल जाहीर करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. ट्विट- 

  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा करू नये, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे. उद्या, 15 जुलै रोजी धनंजय मुंडे यांचा वाढदिवस आहे. बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे, यातून मुक्त होण्यासाठी सर्वांनी आहेत तिथेच राहून प्रयत्न करावेत, याच माझ्यासाठी या वर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

पुणे शहरात आज नव्याने 750 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्ण संख्या 29,107 झाली आहे. यामध्ये 728 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 9,409 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 1,71,772 झाली असून, आज 5,749 स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या.

 कोविड19 च्या रुग्णांवर उपचारासाठी ‘प्लाझ्मा थेरपी’ उपयुक्त ठरत असली तरी या संदर्भात फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने त्यापासून सावध रहावे, अशा सूचना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्या आहेत. ट्वीट-   

मुंबई, ठाणे, पालघर किनारपट्टीलगत जिल्ह्यात पुढील २4 - 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे यांच्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी  कोरोना मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारांसाठी 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

मुंबई मध्ये आज 969 नवे कोरोना रुग्ण आढळले असून यानुसार शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 94,863 वर पोहचली आहे. आजच्या दिवसभरात 1011 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 70 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील सांताक्रूझ आणि कुलाबा भागात आज अनुक्रमे 68 मिमी आणि 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील 2 ते 3तास मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्रात आज कोरोनाबाधितांच्या संख्येत 6,741 नव्या रुग्णांची भर पडली आहे. याशिवाय 213 मृत्यूंची सुद्धा नोंद झाली आहे. यानुसार, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2,67,665 वर पोहचली आहे. राज्यात आजवर 10,695 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सचिन पायलट यांना राजस्थान उप मुख्यमंत्री पदावरून काढून टाकल्यावर त्यांनी ट्विट करून आपल्या समर्थकांचे आभार मानले आहेत.

Load More

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या संकट अद्याप दाट आहे. कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचा अधिक संसर्ग असलेली ठिकाणं पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई ही शहरं लॉकडाऊन करण्यात आली असून आजपासून पुण्यात लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. हा लॉकडाऊन 23 तारखेपर्यंत कायम राहणार आहे. तर मुंबईत लॉकडाऊनची परिस्थिती नियंत्रणात असल्याने लॉकडाऊनची आवश्यकता नसल्याचे महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले आहे.

दरम्यान 10, 12 वीच्या निकालाचे वेध विद्यार्थी आणि पालकांना लागले आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीचे निकाल जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत लावण्यात येतील अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. तर 10 वीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत लागेल असेही सांगण्यात आले होते. कोरोनाच्या संकटामुळे लांबलेला निकाल आता लवकरात लवकर लागावा आणि प्रतिक्षा संपावी, असे विद्यार्थ्यांसह पालकांनाही वाटत आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

भारतात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्त एकूण 878254 रुग्ण असून त्यापैकी 553471 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 301609 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान 23174 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. ही रुग्णसंख्या सातत्याने वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही दिलासादायक आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सुधारत आहे. मात्र कोरोना विषाणूवर लस किंवा औषध उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे संकट कायम राहणार आहे.