महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; राज्यात एका दिवसात 221 नवे रुग्ण आढळले तर, 22 लोकांचा मत्यू; 12 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
Apr 12, 2020 11:27 PM IST
आज ईस्टर संडे हा सण असून जगभरातील ख्रिश्चन बांधव हा सण अगदी उत्साहात साजरा करतात. मात्र यंदा संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटाचा सामना करत असल्याने सणाला साधे स्वरुप आले आहे. मुंबईत देखील चर्चेस लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे ख्रिश्चन बांधवांना आज एकत्रितपणे हा सण साजरा करता येणार नाही. कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या भारत देशात झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ओडिसा, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्येही लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. या यादीत आता महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या 7529 झाली असून 242 नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. तर 653 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे.
महाराष्ट्र राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता 1761 वर जाऊन पोहचला आहे. त्यात दर दिवशी नव्या रुग्णांची भर पडते. त्यामुळे कोरोनाची संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच राज्यातील पुढच्या टप्प्यातील लॉकडाऊनची व्यवस्था कशी असणार याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही दिवसात माहिती देणार आहे. तसंच राज्यातील काही ठिकाणी लॉकडाऊनचे नियम अंशतः शिथिल करण्यात येतील तर काही ठिकाणी नियमांची स्वरुप कडक असेल, अशी कल्पना मुख्यमंत्र्यांनी काल जनतेला संबोधित करताना दिली आहे. लॉकडाऊनचे पडसाद विविध स्तरावर उमटत आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच जेरीस आलेले रोजंदारी कामगार, मजूर अधिकच हवालदिल झाले आहेत. त्याचबरोबर लहानमोठे व्यवसाय, उद्योगधंदे असणारे व्यावसायिक यांच्या समोरील समस्याही वाढल्या आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
इटली, स्पेन पाठोपाठ अमेरिकेत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. प्रत्येक दिवशी 2000 हून अधिक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 1,920 कोरोना बाधित नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्या तुलनेत वेळीच लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने भारत देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र येत्या काळात कोरोनाचा फैलाव कितपत वाढतो? का लांबवलेल्या लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणात येते? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.