पुण्यात कोरोनाचे आणखी 2840 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 15 जणांचा बळी ; 11 मार्च 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Mar 11, 2021 11:45 PM IST
यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले ते मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाने. या प्रकरणात चर्चेत आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी बदली करण्यात आली. त्यासाठी विरोधकांनी सरकारवर प्रचंड दबाव आणला होता. हे प्रकरण आता पुढे काय वळण घेते याबाबत उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला कुख्यात डॉन रवी पुजारी याने न्यायालयात काल स्वत:हून पोलीस कोठडी वाढवून मागितली. रवी पुजारी याला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याबाबत अथवा त्यांना खंडणी मागितल्याबद्द काही माहिती द्यायची आहे का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. असे असले तरी या सर्व केवळ चर्चा आहेत. सत्य बाहेर येण्यासाठी काही काळ वाटच पाहावी लागणार आहे.
राज्यातील कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र होते. आता मात्र स्थिती उलट पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने उसळी घेतली आहे. काल (बुधवार, 10 मार्च) राज्यात 13, 659 कोरोना रुग्णांची नोंद झाली. परवाच्या म्हणजेच मंगळवारच्या (9 मार्च) तुलनेत ही संख्या चार हजारांनी वाढली आहे. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी पूर्णत: तर काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वीज ग्राहकांना चांगलाच शॉक बसला. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबील वसुलीला दिलेली स्थगिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उठवली. त्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना आता यापुढे वीजबील भरले नाही तर त्यांची वीजपूरवठा खंडीत होऊ शकतो.
एका बाजूला देशभरात असलेले कोरोनाचे सावट. तर दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणूक प्रचारासाठी होत असलेली प्रचंड गर्दी. हा विरोधाभास प्रकर्शने जाणवतो आहे. पश्चिम बंगाल, केरळ, असम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी आदी राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. या राज्यांमध्ये कोरोना नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे कसे पालन केले जाते हेही पाहावे लागणार आहे.