फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सारकोझी यांना तीन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा; 1 मार्चच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Chanda Mandavkar
|
Mar 01, 2021 11:18 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील AIIMS रुग्णालयात कोरोनावरील लस घेतली आहे. तर आजपासून देशभरात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांना सुद्धा कोरोनाची लस शासकीय रुग्णालय किंवा केंद्रामध्ये घेता येणार आहे. परंतु खासगी रुग्णालय किंवा केंद्रात जर लस घ्यायची असल्यास त्यासाठी मात्र नागरिकांना 250 शुल्क मोजावे लागणार आहे. आतापर्यंत लसीकरण फक्त आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी केले जात होते. त्यानंतर आता एक मार्च पासून सामान्य नागरिकांना सुद्धा लसीकरण दिले जाणार आहे. तर कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लसीकरणासाठी खासगी क्षेत्राची भागीदारी वाढवली जात आहे. आयुष्यमान भारत पीएमजेएवाय अंतर्गत जवळजवळ 10 हजार रुग्णालय आणि सीजीएचएस अंतर्गत 687 रुग्णालयांचा लसीकरणासाठी वापर केला जाऊ शकतो.
तर महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होईल. यंदा 10 दिवस हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून, प्रश्नांवरुन विरोधक सरकारला घेरणार आहेत. तर दुसरीकडे सरकार देखील आपण केलेल्या कामांचा लेखाजोगा अधिवेशनात सादर करतील. वीज बिल, मंत्र्यांवरील आरोप, शक्ती कायदा, कोरोना व्हायरसची राज्यातील परिस्थिती यांसारख्या अनेक मुद्दयांवर या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ होऊ लागली आहे. दिवसाला 1 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने महापालिकेकडून कठोर पावले उचलली जात आहे. तसेच मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात सुद्धा आता महापालिकेसह मुंबई पोलिसांना दंड आकारण्यास परवानगी दिली गेली आहे.