Shahi Jama Masjid Sambhal | ANI

New Delhi: संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भातील सर्वेक्षण अहवाल गुरुवारी चंदौसी न्यायालयात सादर करण्यात आला आहे. न्यायालयाचे आयुक्त रमेश राघव यांनी सुरक्षेच्या कारणास्तव दिवाणी न्यायाधीश आदित्य सिंह यांच्या न्यायालयात गुपचूप हा अहवाल सादर केला.  या अहवालातून अनेक मोठे खुलासे झाले आहेत. सर्वेक्षणादरम्यान मशिदीत दोन वडाची झाडे आढळून आली आहेत. याशिवाय मशिदीत एक विहीरही सापडली असुन ती अर्धी मशीदित आणि अर्धी बाहेर आहे. बाहेरचा भाग झाकण्यात आला आहे. मशिदीत ५० हून अधिक फुलांची चिन्हे सापडली आहेत, जी हिंदू धार्मिक चिन्हांशी जुळतात. घुमटाचा काही भाग सपाट करण्यात आला आहे.

मशिदीच्या आत सापडले विहीर आणि वडाचे झाड

संभलच्या शाही जामा मशिदीत मंदिर असल्याचा पुरावा आहे. मशिदीच्या आत दोन वडाची झाडे आहेत. सर्वसाधारणपणे वडाच्या झाडाची पूजा हिंदू धर्मातील मंदिरांमध्येच केली जाते. इतकंच नाही तर मशिदीत एक विहीरही आहे, जी अर्धी आत आणि अर्धी बाहेर आहे. बाहेरचा भाग झाकण्यात आला आहे. जुने बांधकाम व नवीन बांधकामात बदल झाल्याचे पुरावे आहेत.मशिदीचा काही भाग मंदिराच्या आकाराचा होता, जो प्लास्टर आणि रंगाने झाकलेला होता, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. घुमटात लटकलेली झालर मंदिरात वापरल्या जाणाऱ्या साखळीने बांधली जाते.

हरिहर मंदिर असल्याचा दावा

सर्वेक्षणादरम्यान साडेचार तासांची व्हिडिओग्राफी करून सुमारे १२०० छायाचित्रे घेण्यात आली आहेत. या मशिदीबाबत असा दावा करण्यात आला आहे की, हे पूर्वी हरिहर मंदिर होते. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ खंडपीठात १९ नोव्हेंबर रोजी ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मशिदीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. मात्र, सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण अधिक चव्हाट्यावर आले.