BJP | (File Image)

राज्य विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी (Election 2024) भाजप (BJP) निवडणुकीच्या तयारीत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी 14 राज्यांच्या प्रभारींची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार बिप्लब देव (Biplab Dev) यांना हरियाणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. दुसरीकडे, ओम माथूर (Om Mathur) यांना छत्तीसगडचे प्रभारी, तर नितीन नवीन (Nitin Navin) यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  याशिवाय तरुण चुघ हे तेलंगणाचे प्रभारी आणि अरुण सिंग (Arun Singh) राजस्थानचे प्रभारीपद सांभाळतील.

याशिवाय विनोद तावडे (Vinod Tawde) यांची बिहारचे प्रभारी तर खासदार हरीश द्विवेदी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे खासदार विनोद सोनकर यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय झारखंडचे लक्ष्मीकांत बाजपेयी यांना प्रभारी बनवण्यात आले आहे. तर केरळसाठी प्रकाश जावडेकर यांची प्रभारी आणि राधामोहन अग्रवाल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, लक्षद्वीपसाठी फक्त खासदार राधामोहन अग्रवाल हेच प्रभारी असतील. त्याचवेळी पी.मुरलीधर राव प्रभारी आणि पंकजा मुंडे आणि खासदार रमाशंकर काथडीया यांची मध्य प्रदेशसाठी सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या यादीनुसार पंजाबचे प्रभारी आमदार विजय रुपाणी यांची प्रभारी आणि नरिंदर सिंग रैना यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हेही वाचा Pune Ganpati Visarjan 2022: चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे यांचे एकत्र 'गणपती बाप्पा मोरया'; गणेशविसर्जन मिरवणुकीत दोघांकडून पालखीला खांदा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तरुण चुग यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली असून राज्याचे प्रभारी बदललेले नाहीत. तर अरविंद मेनन सह-प्रभारी भूमिकेत दिसणार आहेत. दुसरीकडे, विजय रुपाणी चंदीगडसाठी प्रभारी राहणार असून राज्यासाठी सहप्रभारी नियुक्त करण्यात आलेले नाहीत. याशिवाय अरुण सिंह यांना राजस्थानचे प्रभारी आणि विजय रहाटकर यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. खासदार महेश शर्मा यांची त्रिपुराचे प्रभारी म्हणून निवड झाली आहे.

दुसरीकडे, बिहारचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री मंगल पांडे यांची पश्चिम बंगालचे प्रभारी म्हणून आणि अमित मालवीय आणि आशा लाक्रा यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय संबित पात्रा यांची ईशान्य राज्याच्या निमंत्रकपदी तर ऋतुराज सिन्हा यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.