Prime Minister Narendra Modi | File Image | (Photo Credits: Getty Images)

World Leaders on Facebook 2019: 2014 साली भाजप (BJP) सरकार सत्तेत आल्यावर, प्रचार, प्रसार, लोकप्रियता वाढवणे यासाठी सोशल मिडियाचा फार मोठ्या प्रमाणात वापर सुरु झाला. त्यात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे इतके परदेशी दौरे झाले की आज जगात कानाकोपऱ्यात त्यांचे नाव पोहचले आहे. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, याचीच परिणती नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढण्यात झाली आहे. फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून आज नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. याबाबत मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि ब्राझीलचे नवीन राष्ट्रपती जायर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) यांनादेखील मागे टाकले आहे.

2019 वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला 4.35 कोटी लाईक्स आहेत तर त्यांच्याशी जोडलेल्या इतर पेजला जवळपास 1.37 कोटी लाईक्स मिळाल्या आहेत. याबाबत डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला 2.30 कोटी लाईक्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर जॉर्डनची रानी रानिया  (Queen Rania) यांचे नाव आहे, ज्यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला 1.69 कोटी लाईक्स आहेत. या यादीत आघाडीच्या 10 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचेही नाव आहे. जायर बोल्सोनारो हे फेसबुकवरील सर्वात व्यस्त जागतिक नेते ठरले आहेत, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आहे. (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशवारी नंतर भारताला 'लक्षावधी मिलियन्स अमेरिकन डॉलर'चा फायदा)

सध्या सोशल मिडियाची पॉवर चांगलीच वाढली आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेते, राजकीय पक्ष स्वतःच्या फेसबुक पेजला प्रमोट करत सोशल मिडीयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी स्वतःच्या जाहिराती पोस्ट करण्यासाठी फेसबुकला पैसेही देण्यात येत आहेत. हा अहवाल फेसबुकच्या CrowdTangle टूलच्या मदतीने केला जातो,  यामध्ये देशातील प्रमुख व्यक्ती, सरकार, पक्ष यांच्या 962 फेसबुक पेजचे विश्लेषण करण्यात येते.