नुकतेच दिल्ली सचिवालयातील कार्यालयाबाहेरच अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने मिरची पूड फेकली होती. ही घटना ताजी असताना, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जनता दरबारात एका संशयित व्यक्तीकडे जिवंत काडतुसे सापडल्याने आता एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेतले आहे. मोहम्मद इमरान (38) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर आयोजित जनता दरबार कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मोहम्मद इमरान आला होता. मोहम्मद इमरानसह 12 अन्य मौलवीही त्याच्यासोबत होते. दिल्ली वक्फ बोर्डमधील कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी, अशी शिफारस करण्यासाठी तेजनता दरबारात आले होते. त्यावेळी तपासणीदरम्यान त्याच्या खिशात पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडले. त्यानंतर त्याला पोलिसांनी लगेच आपल्या ताब्यात घेतले. मस्जिदच्या दानपेटीत ही काडतुसे मिळाली होती. ते काढून मी माझ्या बॅगेत ठेवले. परंतु, मुख्यमंत्र्यांना भेटायला येताना ती काडतुसे काढण्यास विसरलो, असे आरोपी तरुणाने सांगितले आहे. मोहम्मद इमरान हा सीलमपूर येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिरचीपूड हल्ल्याच्या काही दिवसानंतरच ही घटना घडल्याने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपल्या हत्येचा कट रचला जातोय, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना सुरक्षा पुरवू शकत नसतील, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.