Karnataka: कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात एका जैन साधूची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुनी कमकुमार नंदी महाराज (Muni Kamkumar Nandi Maharaj) हे बुधवारपासून बेपत्ता होते. गुरुवारीच भाविकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. जिल्ह्यातील चिक्कोडी भागातील ही घटना आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करून एका संशयिताची चौकशी केली. त्याने जैन साधूची हत्या करून मृतदेह फेकल्याची कबुली दिली. या प्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आचार्य श्री कमकुमार नंदी महाराज हे बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावात असलेल्या नंदीपर्वत आश्रमात गेल्या 15 वर्षांपासून राहत होते. दरम्यान, गुरुवारी आचार्य कमकुमारनंदी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमप्पा उगरे यांनी जैन साधू बेपत्ता झाल्याची पोलिस तक्रार दाखल केली. चिक्कोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संशयाच्या आधारे दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान जैन साधू कमकुमार नंदी महाराज यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. सध्या पोलिसांनी जैन साधू कमकुमार नंदी महाराज यांच्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे.
जैन मुनींची हत्या कुठे केली आणि मृतदेह कोठे फेकले याची स्पष्ट माहिती आरोपी पोलिसांना देत नाहीत. कटकबावी गावाजवळ जैन साधूच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून देण्यात आल्याची एक बाब समोर येत आहे. दुसरीकडे, मृतदेह कापडात गुंडाळून नदीत फेकल्याचे बोलले जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत कटकबावी गावात शोधमोहीम राबवली. (हे देखील वाचा: Video: केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये विहिरीत अडकलेल्या 55 वर्षीय व्यक्तीला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू)
जैन साधू कमकुमार नंदी यांच्या मृतदेहाचा शोध शनिवारीही सुरूच आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी आश्रमातून जैन साधूचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. हिरेकोडी गावातील नंदी पर्वत आश्रमात सध्या शांततेचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.