मायावती आणि राहुल गांधी (Photo-PTI)

Mayawati gives support to Congress : अटीतटीच्या रंगलेल्या विधानसभा निवडणुकींचे सर्व निकाल हाती आले आहेत. पाचपैकी तब्बल तीन राज्यांत कॉंग्रेसला बहुमत मिळाले आहे. छत्तीसगड आणि राजस्थान मध्ये कॉंग्रेसने मारलेली मुसंडी पाहता लवकरच कॉंग्रेसला ‘अच्छे दिन’ येतील हे निश्चित झाले आहे. या सर्वांमध्ये भारताचे लक्ष लागले होते ते मध्यप्रदेशच्या निकालावर. वर्षानुवर्षे भाजपाचा गड असलेल्या मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेस आणि भाजपामध्ये काट्याची टक्कर होती. शेवटी तेथे काँग्रेसला 114 जागा मिळाल्या असून भाजपाला 109 जागांवर समाधान मानावे लागले आहे. बहुमतापासून काँग्रेस फक्त दोन हात दूर आहे, अशातच आता सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. बहुमत निर्माण करण्यात दोन्ही पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करतील हे निश्चितच. यासाठी त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर  झालेल्या पराभवातून भाजपा अजून सावरत आहेत तोपर्यंत अजून एक झटका त्यांना मिळाला आहे. बहुजन समाज पक्षाच्या मायावतींनी (Mayawati) कॉंग्रेसला आपला पाठींबा दर्शवला आहे. (हेही वाचा : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य)

मध्यप्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. मायावतींच्या बसपाच्याही दोन जागा मध्य प्रदेशात निवडून आल्या आहेत. मायावतींनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करू शकणार आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मायावतींनी कॉंग्रेसला पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेसच येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

राजस्थानमध्येही काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी एका जागेची आवश्यकता आहे. मायावतींच्या राजस्थानमध्ये 6 जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे मायावतींच्या पाठिंब्याने कॉंग्रेस राजस्थानमध्येही सत्ता स्थापन करू शकते हेही निश्चित झाले आहे.

मध्य प्रदेशात गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल राज्यपाल आहेत. त्या मोदी यांच्या अत्यंत विश्वासू समजल्या आहेत. आज सायंकाळी चार वाजता भाजपची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीतून जी फलनिष्पती होईल, त्यावरूनच राज्यपाल आनंदीबेन पटेल निर्णय घेतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.