Assembly Elections Results 2018 : मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी त्यांची आश्वासने पाळली नाहीत; विजयानंतर राहुल गांधी यांचे भाष्य
राहुल गांधी (Photo: ANI Twitter)

Rahul Gandhi Press Conference : छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) भाजपावर मात करून मिळवलेल्या विजयावर पहिल्यांदाच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाष्य केले आहे. ‘आमचे कार्यकर्ते, शेतकरी आणि देशातील युवा वर्ग यांचा हा विजय आहे. आता कॉंग्रेसची जबाबदारी अजूनच वाढली आहे. त्यामुळे आता आम्ही जनतेसाठी चांगलेच काम करू’, असे मत राहुल गांधींनी व्यक्त केले आहे. या विजयासंदर्भात होत असलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच त्यांनी या विजयाबद्दल देशातील जनतेचे अभिनंदन केले आहे, जे तेलंगना आणि मिझोरममध्ये जिंकले त्यांचेही अभिनंदन केले आहे. विजयानंतरची ही त्यांची पहिली पत्रकार परिषद आहे, पत्रकार परिषदेत त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली.

पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, 'मोदींनी ज्या आशा दाखवल्या, जी वचणे दिली, आश्वासने दिली ती त्यांनी पूर्ण केली नाहीत, म्हणूनच 2019 मध्ये आम्ही त्यांना जिंकू देणार नाही. पंतप्रधान देशाला रोजगार देऊ शकले नाहीत, GST, नोटबंदी यांसारखे चुकीचे निर्णय घेतले गेले अशा अनेक कारणांमुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला. देशाला एका नव्या दृष्टीकोनाची गरज आहे, एका नव्या बदलाची गरज आहे तो आम्ही देशाला देऊ. आम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर लक्ष देऊ, त्यांच्यावर कार्य करू. कर्जमाफी हा उपाय नाही, तो फक्त एक सपोर्ट आहे. सत्तेत आल्यानंतर आम्ही हा मुद्दा समूळ नष्ट करू. सध्या रोजगार, शेतकरी आणि भ्रष्टाचार हे देशातील सर्वात महत्वाचे मुद्दे आहेत, आम्ही त्यांच्यावर लक्ष केंद्रित करू' असेही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत, मात्र ‘भाजपमुक्त भारत’ हे आमचे ध्येय नाही. आम्ही सर्वांच्या विचारधारेचा आदर करतो. विरोधक एकत्र आल्यास भाजपाचा पराभव नक्की आहे. नरेंद्र मोदींकडे एक चांगला भारत निर्माण करण्याची संधी होती. जनतेला वाटले की मोदी भ्रष्टाचारविरोधात लढतील मात्र आता मोदीच भ्रष्ट आहेत असे जनतेला वाटू लागले आहे. 2013 च्या विजयानंतर त्यांच्यात माज आला. यामुळेच जनतेचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. सध्या जनता त्यांच्या विरोधात आहे, मोदींची ही परिस्थिती पाहून मला फार वाईट वाटते. हे पाहूनच काय करावे आणि काय करू नये  हे मी शिकलो, असेही राहुल गांधी म्हणाले.