Delhi Fire: मुंडका मेट्रो स्टेशनजवळील तीन मजली इमारतीला भीषण आग; 26 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू

पश्चिम दिल्लीतील (Delhi) ग्रीन लाईनवरील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील (Mundka metro station) एका व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याने 26 जणांचा मृत्यू झाला आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंडका मेट्रो स्टेशनच्या खांब क्रमांक 544 जवळील एका इमारतीत आग लागली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग विझवण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आगीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी इमारतीच्या खिडक्या तोडल्या, लोकांना वाचवले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिस उपायुक्त (बाह्य), समीर शर्मा यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की तीन मजली व्यावसायिक इमारतीचा वापर सामान्यत: कंपन्यांना कार्यालयासाठी जागा देण्यासाठी केला जात होता.

दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळ आज संध्याकाळी लागलेल्या 3 मजली व्यावसायिक इमारतीला लागलेल्या आगीमध्ये 26 मृतदेह बाहेर काढण्यात आले. अशी बातमी एएनआयने दिल्ली अग्निशमन सेवेचे उप मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील चौधरी यांच्या हवाल्याने दिली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मजली व्यावसायिक इमारतीत अजूनही काही लोक अडकले आहेत.

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही शोकसंतप्त कुटुंबियांना शोक व्यक्त केला आहे. दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने दुःखी झालो. शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होवोत, असे कोविंद यांनी ट्विट केले.

कंपनीचा मालक पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहितीही दिल्ली पोलिसांनी दिली. दिल्ली पोलिसांनी पुढे सांगितले की घटनास्थळी एकूण नऊ अग्निशमन दल उपस्थित आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, पीडित व्यक्तीला त्वरित वैद्यकीय मदत देण्यासाठी रुग्णवाहिका सुविधा देखील उपलब्ध आहे.