भारताचे 'पंतप्रधान' आहात की पाकिस्तानचे 'अँबेसिडर'? ममता बॅनर्जी यांचा मोदींना सवाल
Mamata Banerjee, Pm Narendra Modi (PC- PTI)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी मोदींना तुम्ही भारताचे 'पंतप्रधान' आहात की पाकिस्ताचे 'अँबेसिडर'? असा सवाल  केला आहे. ममता बॅनर्जी सिलीगुडी येथील प्रचारसभेत बोलत होत्या. सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (NRC) मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

कर्नाटमधील रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला होता. यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलन म्हणजे संसदेच्या विरोधातील आंदोलन असल्याचे म्हटले होते. तसेच काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी संसदेविरोधात आंदोलन करण्यापेक्षा पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकावर होणाऱ्या आत्याचाराविषयी पाकिस्तान विरोधात आंदोलन करायला हवं, असंही मोदी यावेळी म्हणाले होते. (हेही वाचा - वीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यात समलैंगिक संबंध होते म्हणणाऱ्या काँग्रेसच्या पुस्तकावरून भाजप- शिवसेना मध्ये पुन्हा खडाजंगी; पहा काय म्हणाले संजय राऊत)

ममता बॅनर्जी यांनी मोदींच्या या वक्तव्याचा तिखट शब्दांत समाचार घेतला आहे. मोदींवर निशाणा साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, भारत हा संस्कृती जपणारा देश आहे. पंतप्रधान मोदी नेहमी भारताची तुलना पाकिस्तानसोबत करतात. तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे अँबेसिडर? तुम्ही प्रत्येक मुद्यावर पाकिस्तानच्या नावाचा उच्चार का करता? असे अनेक प्रश्न करत ममता बॅनर्जी यांनी मोदींवर निशाणा साधला.

स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली तरीदेखील आम्हाला या देशाचे नागरिक आहोत की नाही, हे सिद्ध करण्याची वेळ येते. हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे, अशी खंतही ममता बॅनर्जी यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याला विरोध करण्याचे आवाहनही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केले.