
बहुजन समाजवादी (BSP) पक्षाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांना प्रचारासाठी काही नियम लागू केले आहेत. तसेच निवडणुकीच्या पूर्वी पक्षाकडून कशा पद्धतीचे पोस्टर किंवा होर्डिंग लावले जाणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. मात्र होर्डिंग किंवा बॅनरवर पक्षाध्यक्षा मायावती (Mayawati) यांच्या फोटोबरोबर कोणत्याही नेत्याने किंवा कार्यकर्त्याने फोटो छापल्यास त्या पक्षामधून हकालपट्टी केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
लखनौ येथील एका बैठकीत बसपा आमदार आणि पक्षाने स्थापन केलेल्या मंडळ झोनचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. पक्षातील नवीन नेते आणि कार्यकर्ते चुकीच्या पद्धतीने अतिउत्साहात जाहिरातबाजी करतात. त्याचसोबत काही नेते किंवा कार्यकर्ते पक्षाध्यक्षा मायावती यांच्या फोटोसह आपला स्वत:चा फोटो मोठ्या स्वरुपात छापतात. त्यामुळे लोकांकडून पक्षाबद्दल खिल्ली उडवली जाते. त्यामुळेच पक्षाने अशा पद्धतीचे ठोस पाऊल उचलले आहे.
तसेच आगमी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाचे होर्डिंग किंवा पोस्टर छापण्यापूर्वी मंडळातील अध्यक्षांना दाखवून परवानगी घेणे आवश्यक केले आहे. तर मायवती यांचा फोटो छापायचा असल्यास त्यासोबत कांशीराम आणि निवडणुक चिन्ह असणे महत्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे.