Photo Credit- X

LPG Cylinder Found on Railway Tracks in Kanpur: काही दिवसांपूर्वी कानपूरमध्ये रेल्वे रुळांवर गॅस सिलिंडर ठेऊन कालिंदी एक्सप्रेसचा(Kalindi Express) आपघात करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला होता. मात्र, आता पुन्हा कानपूरमध्ये अशीच घटना घडली आहे. कानपूर सेंट्रलजवळ असलेल्या प्रेमपूर रेल्वे स्थानकापासून काही मीटर अंतरावर रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर आढळून (LPG Cylinder on Railway Track)आला. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, सध्या पोलिस घटनेचा तपास करत आहेत. (हेही वाचा: कानपूरमध्ये Kalindi Express उलटवण्याचा कट? रेल्वे रुळावर ठेवला LPG Cylinder, सुदैवाने मोठा अपघात टळला)

आज सकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रेल्वे रुळावरून जाणाऱ्या मालगाडीच्या चालकाच्या रेल्वे मार्गावर सिलिंडर ठेवल्याचे लक्षात आले. यावेळी त्याने आपातकालीन ब्रेक लावला. त्यामुळे मालगाडीचा अपघात टळला. या घटनेची माहिती मालगाडीच्या चालकाने रेल्वेच्या गार्डला, तसेच स्टेशन मास्टर आणि रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता, त्यांना रुळावर लाल रंगाचा ५ लिटरचा खाली सिलिंडर आढळून आला.

दरम्यान, गेल्या आठवडाभरापूर्वी गॅस सिलिंडर ठेऊनच कालिंदी एक्सप्रेस रुळावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही एक्सप्रेस भिवानीवरून प्रयागराजच्या दिशेन जात होती. यादरम्यान, एक्सप्रेस शिवराजपुरा भागात येताच रेल्वे रुळावर सिलिंडर असल्याचे लोको पायलटच्या लक्षात आलं.

याशिवाय १६ ऑगस्ट रोजी कानपूर झांसी मार्गावरही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी साबरमती एक्सप्रेसचे २० डबे रुळावरून खाली घसरले होते. या घटनेत काही जण जखमी झाले होते. या घटनेच्या एका आठवड्यानंतर २३ ऑगस्ट रोज कांसगंज रेल्वेमार्गावरही लाकडं ठेवण्यात आली होती. तेव्हाही मोठी दुर्घटना टळली होती. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली होती. दोघांनी दारुच्या नशेत रेल्वे रुळावर लाकडं ठेवल्याचे कबूल केलं होतं.