Al Qaeda Terrorist Module Exposed In Delhi: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल (Delhi Police's Special Cell) ने अल कायदा (Al Qaeda) च्या एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूल (Terrorist Module) चा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 11 संशयितांना अटक (Arrest) केली असून पाच चे सहा जणांची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राजस्थान, झारखंड आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. अल कायदा मोड्यूलमधून अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी 6 जणांना राजस्थानमधील भिवडीतून, 4 जणांना रांचीतून, 4 जणांना यूपीतील अलीगढमधून आणि एकाला हजारीबागमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, या मॉड्यूलचे नेते डॉ. इश्तियाक अहमद आहेत. ते रांची येथील एका प्रसिद्ध रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागात कार्यरत होते. उर्वरित आरोपींची नावे मोतीऊर, रिजवान, मुफ्ती रहमतुल्ला आणि फैजान अहमद अशी आहेत, ते झारखंडचे रहिवासी आहेत. हसन अन्सारी, उन्कामुल अन्सारी, अल्ताफ अन्सारी, अर्शद खान, उमर फारूख, शाहबाज अन्सारी हे राजस्थानमधील भिवडी येथील आहेत. (हेही वाचा -Terrorists of Lashkar-e-Taiba Arrested: लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक; दोन आयईडी-हँड ग्रेनेड, डिटोनेटर-बॅटरी जप्त)
दिल्ली पोलिसांकडून दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश -
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला डॉ. इश्तेयाकची गुप्त माहिती मिळाली होती. डॉक्टरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची झडती घेतली असता या मॉड्यूलची माहिती मिळाली. या मॉड्यूलशी संबंधित सर्व दहशतवादी सोशल मीडिया ॲप टेलिग्रामच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांनी अनेक ग्रूप देखील तयार केले होते ज्यात काही सदस्य पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इतर अरब देशांतून जोडले गेले होते. (हेही वाचा - Terror Module Busted by Delhi Police प्रकरणामध्ये Maharashtra ATS कडून अजून एका व्यक्तीला मुंब्रा मध्ये अटक)
हजारीबागमधील फैजान देत होता मॉड्यूलला प्रशिक्षण -
या मॉड्यूलला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी हजारीबाग येथून पकडलेल्या फैजानची होती, त्याने शारीरिक प्रशिक्षणाव्यतिरिक्त मॉड्यूलमध्ये उपस्थित संशयितांना वेगवेगळी शस्त्रे वापरण्याचे आणि बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले. फैजान झारखंड, उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या जंगलात मॉड्यूलला प्रशिक्षण देत असे.
अटक केलेल्या आरोपींकडून शस्त्रात्र जप्त -
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या आवारात छापा टाकून एके-47 रायफल, एक.38 बोर रिव्हॉल्व्हर, 38 बोरची 6 जिवंत काडतुसे, 32 बोरची 30 जिवंत काडतुसे, एके-47 ची 30 जिवंत काडतुसे, एक डमी इन्सास, एक एअर रायफल, एक लोखंडी एल्बो पाईप, एक एए आकाराची 1.5 व्होल्ट बॅटरी, एक टेबल घड्याळ, एक कॅम्पिंग तंबू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.