महाराष्ट्र एटीएस (Maharashtra ATS) कडून अजून एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांकडून उधळण्यात आलेल्या दहशतवादी कारवाईशी संबंधित प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. आज (19 सप्टेंबर) एटीएस ने त्याबाबत माहिती दिली आहे. या व्यक्तीची माहिती देण्यात आलेली नाही पण ठाण्यानजिक मुंब्रा (Mumbra) भागातून या व्यक्तीच्या मुसक्या एटीएसने आवळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जोगेश्वरी मधून झाकीर हुसेन शेख या व्यक्तीला एटीएसने ताब्यात घेतल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
शेखने दिलेल्या माहितीवरून एटीएस ने विविध ठिकाणी धाडी टाकल्या आणि अखेर मुंब्रा मध्ये ही व्यक्ती सापडली. दरम्यान मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दहशती कारवाईचा कट उधळत सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये पाकिस्तानी इंटेलिजंस एजन्सी आयएसआय कडून प्रशिक्षण घेतलेल्या 2 दहशतवाद्यांचाही समावेश आहे. Maharashtra ATS आणि Mumbai Police Crime Branch यांच्या संयुक्त टीम्स कडून मुंबईच्या जोगेश्वरी भागातून एका व्यक्तीला दहशतवादी घातपाताच्या संबंधी अटक.
भारतामध्ये काही ठिकाणी ब्लास्ट करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा होता. जान मोहम्मद शेख हा सहा जणांपैकी एक होता. तो मूळचा मुंबईच्या धारावी भागात राहत होता.
झाकीर शेख विरुद्ध मुंबई मध्ये Unlawful Activities (Prevention) Act अंतर्गत वेगळी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. शानिवारी मुंबई कोर्टात एटीएसने दिलेल्या माहितीमध्ये झाकीर शेख याला राज्यात दहशतवादी कारवाई घडवून आणण्यात मदत करत असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे असं म्हटलं आहे. सध्या कोर्टानेही झाकीर शेखला 20 सप्टेंबर पर्यंत एटीएस कस्टडीमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई मध्ये सध्या सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. मुंबई लोकल लक्ष्य असल्याचं समोर आल्याने आता सीसीटीव्ही वाढवण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांची देखील तपासणी सुरू आहे. महत्त्वाच्या स्थानकांवर विशेष पथक तैनात आहे.