Indian Army Truck Accident: लडाखच्या लेह जिल्ह्यात शनिवारी लष्कराची गाडी रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळली. या घटनेत नऊ सैनिक ठार झाले आणि अन्य एक गंभीर जखमी झाला, असे अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. हा अपघात दक्षिण लडाखच्या न्योमा येथील कियारीजवळ घडला. लेहचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पीडी नित्या यांनी सांगितले की, 10 जवानांसह लष्कराचे वाहन लेहहून न्योमाकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ते दुपारी 4.45 वाजता दरीत कोसळले.

पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व जखमी सैनिकांना लष्कराच्या वैद्यकीय सुविधेत हलविण्यात आले जेथे आठ जवानांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर आणखी एका जवानाचा मृत्यू झाला.क्यारी शहरापासून 7 किमी दूर अंतरांवर हा अपघात झाला आहे. जवान असलेला ट्रक दरीत कोसळला. भारतीय जवान कारू गॅरीसनहून सध्या लेहजवळील क्यारीच्या दिशेने जात होते.

अधिकाऱ्याने सांगितले की, आणखी एका जवानावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेत एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच देश भरात दुखद वातावरण पसरले आहे.