Hathras Gangrape: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिताच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारकडून 25 लाखांची मदत जाहीर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Photo Credits : IANS)

उत्तर प्रदेशमधील,(Uttar Pradesh) हाथरस (Hathras) येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा दोन आठवड्यानंतर उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. या घटनेने संपूर्ण देशाला हादरून टाकले आहे. दरम्यान, आज (30 सप्टेंबर) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या सामुहिक बलात्कार प्रकरणी चौकशीसाठी 3 सदस्यीय एसआयटी समिती नेमली असून त्यांना 7 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेतील पीडिताच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची राज्य सरकारने घोषणा केली आहे.

पीडित तरुणी 14 सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेली असताना चार तरुणांनी तिच्या सामूहिक बलात्कार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखे हे प्रकरण असून यात चार आरोपी तरुणांनी बलात्कार करुन तिची जीभ छाटून तिची मान मोडण्यात आल्याचा अमानुष प्रकार घडला आहे. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 29 सप्टेंबर रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे देखील वाचा- Hathras Gangrape Case: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून अंत्यसंस्कार; कुटुंबीयांना घरात कोंडून ठेवल्याचा आरोप

एएनआयचे ट्विट-

उत्तर प्रदेशातील हाथरस गॅंगरेप प्रकरणानंतर देशभरातून राजकीय, बॉलिवूड जगतातील सेलिब्रिटींसोबतच सामान्यांनीदेखील आपला रोष व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, समाजात महिलांवरील होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या घटना अधिकच वाढू लागल्या आहेत. यातच हाथरस येथील घटनेने यात आणखी भर घातली आहे. ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.