Kerala Shocker: केरळमधील कोचीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका दिवसाच्या मुलाला अपार्टमेंटबाहेर फेकण्यात आले. याबाबत कुटुंबीयांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पॅकेटमध्ये गुंडाळलेले एक मूल खाली पडताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला मृतदेह पडलेला एका वाटसरूने पहिला. घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिकांनी सांगितले की, "मुलाला मारून फेकून दिले होते की पडून त्याचा मृत्यू झाला, हे तपासातच समोर येईल." ज्या अपार्टमेंट ब्लॉकमधून नवजात अर्भक रस्त्यावर फेकले गेले होते त्या ब्लॉकमध्ये 21 अपार्टमेंट आहेत, त्यापैकी तीन रिकामे आहेत. अपार्टमेंट ब्लॉकमधील सुरक्षा अधिकारी सकाळी 8 वाजता नाश्ता करण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर लगेचच ही घटना घडली.
स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले की, त्यांच्या माहितीनुसार अपार्टमेंट ब्लॉकमध्ये एकही गर्भवती महिला नव्हती. या प्रकरणाच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाची चौकशी सुरू केली आहे.
कुटुंबात आई-वडील आणि एक मुलगी आहे. अपार्टमेंटच्या सुरक्षा अधिकाऱ्याने मीडियाला सांगितले की, हे कुटुंब शहरातील रहिवासी आहे आणि काही काळापासून येथे राहत आहे.
स्थानिक कौन्सिलरने प्रसारमाध्यमांना सांगितले की, जेव्हा पॅकेट उघडले तेव्हा हे प्रकरण समोर आले की पॅकेटचे कव्हर ॲमेझॉनचे होते. कौन्सिलर म्हणाले, "पॅकेटवरील पत्ता रक्ताने माखलेला होता आणि वाचता येत नव्हता." त्यानंतर कव्हरवरील बार कोड स्कॅन करण्यात आला. कव्हरवर अपार्टमेंटचाच पत्ता होता. अशाप्रकारे पोलिसांनी कुटुंबाची चौकशी सुरू केली." स्थानिक आमदार टी.जी. विनोद म्हणाले की, हे एक क्रूर कृत्य आहे. पोलिसांना या प्रकरणात काही सुगावा लागला आहे.