दिल्लीतील प्रसिद्ध Baba Ka Dhaba चे मालक कांता प्रसाद यांनी दाखल केली यू-ट्यूबर गौरव वासन यांच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार
Kanta Prasad, owner of Baba Ka Dhaba (PC_ANI)

दिल्लीतील 'बाबा का धाबा'चे (Baba Ka Dhaba) मालक कांता प्रसाद (Kanta Prasad) यांनी गौरव वासन (Gaurav Wasan) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गौरव वासन यांनी पहिल्यांदाचं बाबांचा व्हिडिओ शूट करून पोस्ट केला होता. धाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी गौरव वासन यांच्यावर फसवणूक, गैरव्यवहार आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला आहे. गेल्या महिन्यात सोशल मीडियावर दिल्लीतील 'बाबा का धाबा' चे वृद्ध मालक आणि त्यांची पत्नी यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. गौरव वासन यांनी या वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ काढून त्यांना मदत देण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर या बाबाजीसाठी देशभरातील नेटीझन्सनी आर्थिक मदत दिली होती. मात्र, त्यांना देण्यात आलेल्या देणगीच्या पैशाच्या हेरफेर झाल्याची बाब समोर आली आहे.

या प्रकरणात, यू-ट्यूबर लक्ष्य चौधरी यांनी अलीकडेचं आरोप केला आहे की, देणगी म्हणून गोळा केलेला निधी ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांच्यापर्यंत पोहोचला नाही. बाबांचा ढाबा स्पॉटलाइटमध्ये आणणाऱ्या यू-ट्यूबर गौरव वासनवर मदतीच्या नावाखाली मोठी रक्कम हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाबासाठी येणारे पैसे हे गौरव आणि त्यांची पत्नी यांच्या बँक खात्यात येत असतं. (हेही वाचा - Chhattisgarh: पोलीस कर्मचाऱ्याचे अमानवीय कृत्य; दीड वर्षांच्या मुलीला दिले सिगारेटचे चटके, भिलाई येथील हॉटेलमधून अटक, गुन्हा दाखल)

दरम्यान, या प्रकरणी ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी मालवीय नगर पोलिस ठाण्यात गौरव विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांना यासंदर्भात तक्रार मिळाली असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. ऑक्टोबरमध्ये 'बाबा का ढाबा' चा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये ढाब्याचा मालक कांता प्रसाद यांनी डोळ्यात पाणी आणून जगभरातील साथीच्या काळात त्याचे उत्पन्न 100 रुपयांपेक्षा कमी असल्यातं म्हटलं होतं. हा व्हिडिओ यू-ट्यूबर गौरव वासनने शूट केला होता. गौरवने हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड करत दिल्लीकरांना वृद्ध जोडप्यास मदत करण्याची विनंती केली होती. तसेच या दाम्पत्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते.