Chhattisgarh: पोलीस कर्मचाऱ्याचे अमानवीय कृत्य; दीड वर्षांच्या मुलीला दिले सिगारेटचे चटके, भिलाई येथील हॉटेलमधून अटक, गुन्हा दाखल
Cigarette (Photo Credits: Pixabay)

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बालोद जिल्ह्यातून (Balod District) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका पोलिस कॉन्स्टेबलने दीड वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर सिगारेटचे चटके दिले आहेत. घटनेनंतर मुलीच्या आईने बालोद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला भिलाई येथून अटक केली आहे. आरोपी अविनाश राय बालोद पोलिस ठाण्यात तैनात होता आणि सिवनी गावात एका भाड्याच्या घरात राहत होता. आरोपी ज्या भाड्याच्या घरात राहत होता त्याच्या घरमालकाच्या मुलीला त्याने सिगारेटचे चटके दिले आहेत.

घटनेनंतर मुलीची आई मुलीसह बालोद पोलिस स्टेशन येथे गेली आणि फिर्याद दिली. महिलेने सांगितले की, अविनाश रायने घरी येऊन मुलीला सिगारेटचे चटके दिले व त्यानंतर तो फरार झाला. दुर्ग पोलिस लाईनमध्ये तैनात अविनाश राय गुरुवारी रात्री नऊ वाजता या मुलीच्या घरी पोहोचला. तेथे त्याने दीड वर्षाच्या मुलीला स्वत: ला बाबा म्हणण्यास सांगितले. मुलगीने तसे न केल्याने अविनाशने तिला सिगारेटचे चटके दिले. मुलगी किंचाळत होती मात्र अविनाश थांबला नाही. यामध्ये मुलीचा चेहरा आणि शरीराचा इतर भाग भाजला आहे.

रात्री मुलीच्या आईने बालोद कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी यांना याबाबत माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मुलीवर प्राथमिक उपचार सुरु केले. यानंतर पोलिसांनी आई आणि मुलीला सखी सेंटर झालमला येथे ठेवले आहे. (हेही वाचा: आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असताना 'त्या' तरुणीवर लैंगिक अत्याचार झालाच नाही; गुरुग्राम पोलिसांची माहिती)

आईच्या तक्रारीनंतर जेव्हा पोलिस घरी पोहोचले तेव्हा आरोपीने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. पोलिस त्या खोलीचा दरवाजा तोडू शकले नाहीत म्हणून त्यांनी बाहेरून कुलूप लावले. शुक्रवारी सकाळी आरोपी तेथून पळून गेला. प्रभारी पोलिस अधिकारी जी.एस. ठाकूर यांनी सांगितले की, आरोपी थकबाकी भरण्यासाठी मुलीच्या घरी आला होता. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. आरोपीविरोधात कलम 294, 323, 324 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.