![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/09/arrest.jpg?width=380&height=214)
Jharkhand: झारखंडमधील चार जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी विशेष कारवाई करत सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची अफूही शेती उद्ध्वस्त केली आहे. रांची, खूंटी, सरायकेला-खरसावां आणि चाईबासा या ठिकाणी अफूची अवैध शेती सुरु होती. या कारवाईत आतापर्यंत या अवैध धंद्यात गुंतलेल्या 86 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार आतापर्यंत ट्रॅक्टर आणि गवत कापण्याच्या यंत्राचा वापर करून एकूण 9 हजार 871 एकर अफूची लागवड शोधून नष्ट करण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांपैकी खुंटी येथे सर्वाधिक प्रमाणात अफूची लागवड नष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. या मोहिमेदरम्यान अफू लागवडीचे समाजावर होणारे दुष्परिणाम आणि या अवैध धंद्यात सहभागी होण्यासंदर्भातील कडक कायदेशीर तरतुदींबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी बैठका व मेळावे घेण्यात येत आहेत.
5 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या कारवाईत या चार जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांबरोबरच सर्व उपविभागात तैनात एसडीपीओ आणि 11 डीएसपींवर या विशेष मोहिमेची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पोलिस ठाण्यांच्या पोलिस दलाव्यतिरिक्त 1500 अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अफूची बेकायदा लागवड केल्यास २० वर्षांपर्यंत च्या तुरुंगवासाची तरतूद असल्याची माहिती लोकांना दिली जात आहे.
एक एकर क्षेत्रात केलेल्या लागवडीतून सरासरी तीन ते चार किलो उत्पादन घेतले जाते, तर एक किलो अफूचा बाजारभाव चार ते पाच लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचे अफू बाजारात येण्यापासून रोखण्यात आले आहे. 'झिरो टॉलरन्स पॉलिसी'अंतर्गत अफू लागवडीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दिले आहेत.
चाईबासा जिल्ह्यातील बंडगाव, टेबो, कराईकेला आणि टोकलो पोलीस ठाण्याच्या हद्दीत 394 एकर अफूचे पीक नष्ट झाले असून 12 जणांना अटक करण्यात आली आहे, तसेच सरायकेला-खरसावां जिल्ह्यातील कुचाई, इचागड, चौका आणि खरसावां पोलिस ठाण्याच्या हद्दीत 520 एकर जमीन आहे.
जिल्ह्यातील मुरुहू, आडकी, खुंटी, सायको आणि मारंगडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 6 हजार 473 एकरवरील पीक उद्ध्वस्त झाले असून 55 जणांना अटक करण्यात आली आहे. रांची जिल्ह्यातील बुंडू, तामार, दशमफळ, राहे, सोनाहट आणि नामकुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2484 एकरक्षेत्रावर अफूची लागवड आढळून आली असून एकूण 19 जणांना अटक करण्यात आली आहे.