मुंबईतील मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाच्या प्रकरणात जैश-उल हिंद (Jaish-ul-Hind) नावाच्या संस्थेने जबाबदारी स्वीकारली आहे. या संस्थेने टेलिग्राम अॅपद्वारे जबाबदारी स्वीकारली आहे. काही दिवसांपूर्वी याच संस्थेने दिल्लीतील इस्राईल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. बिटकॉइनद्वारेही या संस्थेकडून पैशांची मागणी केली जात होती.
संस्थेने एका संदेशाद्वारे तपास यंत्रणेला आव्हान दिले आहे. या संस्थेने संदेशात असं लिहिलं आहे, "जर तुम्ही थांबवू शकता तर थांबवा, तुम्ही तेव्हा काही करू शकला नाहीत, जेव्हा दिल्लीत तुमच्या नाकाखाली स्फोट घडवून आणला. आपण मोसादला हात जोडला. परंतु, काही झालं नाही. तुम्ही लोक अपयशी ठरलात. तुम्हाला अजून यश मिळणार नाही. संदेशाच्या शेवटी (अंबानींसाठी) लिहिलेलं आहे की, आपल्याला काय करायचं आहे हे माहित आहे. तुम्हाला सांगितलेले पैसे फक्त हस्तांतरित करा." (वाचा - मुंबई: मुकेश अंबानी यांच्या Antilia जवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार, बॉम्ब शोधक-विनाशक पथाकडून अधिक तपास सुरु (Video))
दरम्यान, 25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी संशयास्पद कार सापडली होती. यात 20 जिलेटिन काड्या सापडल्या होत्या. बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ कार अँटिलियाच्या बाहेर उभा करण्यात आली होती. येथे इनोव्हा कारसह दोन वाहने दिसली होती. वाहन चालकाने एसयुव्ही अँटिलिया बाहेर उभी केली. अंबानीच्या घरच्या सुरक्षा कर्मचार्यांनी घराच्या बाहेर संशयास्पद कार पाहिल्यानंतर स्थानिक पोलिसांना कळविले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला.
दिल्लीत इस्त्रायली दूतावासाजवळ 29 जानेवारी रोजी संध्याकाळी स्फोट झाला होता. या स्फोटात सुमारे 5-6 वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा स्फोट झाला त्यावेळी दिल्लीत काही अंतरावर बीटिंग रिट्रीट कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात मोठ-मोठे नेते सहभागी होते. या घटनेनंतर जैश-उल हिंद नावाच्या संस्थेने दिल्लीतील स्फोटाची जबाबदारी स्विकारली होती.