आजीवन कारावासाची शिक्षा झालेला एक कुख्यात गुंड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होतो, याची अगदी चित्रपटात शोभेल अशी घटना घडली आहे. बदान सिंग (Badan Singh) असे या गँगस्टरचे नाव असून, त्याला 1996 साली एका वकिलाचा खून केल्याच्या गुन्ह्यात अटक झाली होती. आरोपी बदान सिंगला सहा पोलिसांच्या सुरक्षेत फतेहगड सेंट्रल जेलमधून गाझियाबाद येथील न्यायालयात सादर करण्यासाठी नेले होते, तिथून परतत असताना पोलिसांना दारूचे आमिष दाखवून, त्यांना दारू पाजून ते नशेत असताना बदान सिंगने पळ काढला आहे.
कोर्टाच्या सुनावणीसाठी बदान सिंगला गाझियाबाद येथे नेले गेले, तिथून परतत असताना त्याने पोलिसांना एका हॉटेलमध्ये दारूच्या पार्टीचा आस्वाद घेण्याची गळ घातली. ही पार्टी त्याच्या मित्रांकडून आहे असे त्याने सांगितले. पोलीसही या गोष्टीस तयार झाले. पोलीस कर्मचाऱ्यांना दारु पार्टी दिल्यानंतर अटकेत असणारा आरोपी बदान सिंग याने पळ काढला. तब्बल तीन तासांनंतर पोलीस शुद्धीत आले. याप्रकरणी सहा पोलीस कर्मचारी आणि अन्य तिघांना अटक कऱण्यात आली असून चौकशी सुरु आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी अखिलेश नारायण सिंह यांनी दिली.
48 वर्षीय बदान सिंगने 1996 साली वकिलाची हत्या केली होती, या हत्येच्या आरोपाखाली मागच्यावर्षी त्याला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मेरठ पोलिसांनी त्याला अटक केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला फतेहगड सेंट्रल जेलमध्ये शिफ्ट कऱण्यात आले होते. बदान सिंगच्या नावे हत्या, चोरी आणि खंडणीचे 10 गुन्हे दाखल आहेत.