Indian Railways Train Ticket: ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी AC3 इकॉनॉमी क्लासचे भाडे स्वस्त केले आहे. यासोबतच त्यांना पूर्वीप्रमाणेच बेडिंग रोलचीही सुविधा मिळणार आहे. रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ट्रेनच्या इकॉनॉमी कोचच्या बुकिंगमध्ये जुनी प्रणाली पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता ट्रेनच्या AC3 इकॉनॉमी कोचमध्ये प्रवास करणे पुन्हा स्वस्त झाले आहे. बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे रेल्वेने सांगितले. दुसरीकडे, ज्या प्रवाशांनी बुधवारनंतरच्या तारखेसाठी ऑनलाइन किंवा बुकिंग काउंटरवरून प्री-बुकिंग केले आहे, त्यांना तिकिटाची अतिरिक्त रक्कम परत केली जाईल.
रेल्वेच्या नव्या आदेशानुसार इकॉनॉमी क्लास सीटचे भाडे सामान्य एसी 3 वरून कमी करण्यात आले आहे. तथापि, गेल्या वर्षी रेल्वे बोर्डाने एक परिपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये AC3 इकॉनॉमी कोच आणि AC3 कोचचे भाडे समान होते. रेल्वेच्या नव्या परिपत्रकानुसार, भाडे कपातीमुळे इकॉनॉमी कोचमध्ये ब्लँकेट आणि चादर देण्याची पद्धत पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. (हेही वाचा - Indian Railways: भारतीय रेल्वे सेवेबाबत माहिती हवी आहे? बस्स! फक्त डायल करा '139' नंबर, पाहा कमाल)
इकॉनॉमी AC3 कोच ही स्वस्त एअर कंडिशनर रेल्वे प्रवास सेवा आहे. स्लीपर क्लासच्या प्रवाशांना सर्वोत्तम आणि स्वस्त एसी प्रवास देण्यासाठी इकॉनॉमी AC3 कोच सुरू करण्यात आला. या कोचचे भाडे सामान्य AC3 पेक्षा 6-7 टक्के कमी आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, AC3 कोचमध्ये बर्थची संख्या 72 आहे, तर AC3 इकॉनॉमी बर्थची संख्या 80 आहे. कारण AC3 इकॉनॉमी कोचची बर्थ रुंदी AC3 कोचच्या तुलनेत थोडी कमी आहे.
AC3 इकॉनॉमी कोचमधून रेल्वेला पहिल्याच वर्षी 231 कोटी रुपयांची कमाई झाली होती. आकडेवारीनुसार, केवळ एप्रिल-ऑगस्ट 2022 मध्ये, 15 लाख लोकांनी या इकॉनॉमी कोचने प्रवास केला आणि त्यातून रेल्वेने 177 कोटी रुपये कमावले. यावरून हेही स्पष्ट झाले आहे की हे डबे सुरू केल्याने सामान्य एसी-3 वर्गाच्या कमाईवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे रेल्वेने आता एसी थ्री इकॉनॉमीचे भाडे कमी केले आहे.