Temperature in Mumbai: यंदाच्या वर्षी मुंबईकर उन्हाळ्याने काहीसे अधिकच कासावीस होण्याची शक्यता आहे. यंदाचा उन्हाळाही काहीसा दीर्घ काळ मुक्काम ठोकणार असे दिसते. कारण, मार्च महिन्यातच मुंबई शहरात उन्हाच्या झळा (March Heat To Rise In Mumbai) वाढू लागल्या आहेत. तापमानाचा पाराही बऱ्यापैकी वाढता राहात असल्याचे नोंद झाले आहे. शनिवारी शहराच्या तापमानाची नोंद 34.1 डिग्री सेल्सियस इतकी झाली. येत्या काळात हे प्रमाण 40 डिग्री सेल्सियसवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) द्वारा नोंदविण्यात आलेला अंदाज असा की, रविवारी (24 मार्च 2019) शहराचे कमाल तापमान हे 34 तर, किमान तापमान 20 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहील.
हवामान आणि हवामान बदलासंबंधी सातत्याने निरिक्षणे नोंदवणारी आणि माहिती देणारी खासगी हवामान संस्था 'स्कायमेट वेदर' सांगते की, मुंबईत येत्या 72 तासांच्या कालावधीत आजचे तापमान हे 34 ते 35 डिग्री सेल्सियस इतके राहिल तर, पुढे हेच तापमान 38 ते 40 डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, 'ऑक्टोबर हीट' सुसह्य करायला मदत करतील या 5 एक्सपर्ट टीप्स !)
दरम्यान, गेल्या काही काळात मुंबईत वाढत्या तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्र आणि गुजरात सध्या उन्हाळा आणि दुष्काळी स्थितीचा सामना करत आहेत. शनिवारी जेव्हा तापमान वाढले तेव्हा ईएमडी कुलामा आणि सांताक्रूझ वेधशाळेने हवेतील आद्रतेचे प्रमाण अनुक्रमे 64 टक्के आणि 37 टक्के इतके सांगितले. टीओआयच्या वृत्तानुसार शहरात शनिवारी नेहमीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. मुंबईत शुक्रवारी यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. हे तापमान 34.5 डिग्री सेल्सियस इतके होते. हवामान विभागाच्या कुलाबा वेदशाळेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कमाल तापमान हे 31.5 डिग्री इतके होते.