Shubh Mangal Zyada Saavdhan Kiss (Photo Credits: YouTube)

सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 (Section 377) रद्द करू जणूकाही समलैंगिक (Homosexual) लोकांना नवसंजीवनीच दिली आहे. आजकाल समलैंगिकतेबाबत समाजामध्ये जागरुकता निर्माण व्हावी, एलजीबीटीक्यू (LGBTQ) लोकांचाही ते जसे आहेत तसा स्वीकार व्हावा यासाठी बरेच प्रयत्न सुरु आहेत. आता पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये मुलांना 'सर्वसमावेशकते'ची जाणीव करून देण्यासाठी, समलैंगिक संबंधांवरील आठ लघुपट दाखवले जाणार आहेत. 'प्रयासम्स बॅड' (Prayasam’s Bad) आणि 'ब्युटीफुल वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल'मध्ये निवडलेले हे चित्रपट आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कोरोना विषाणू आपत्तीनंतर विविध राज्यातील शैक्षणिक संस्था हळूहळू सुरू होत आहेत. अशात ‘तरुण चित्रपट दिग्दर्शकांनी’ बनवलेले हे लघुपट लवकरच विद्यार्थ्यांना शाळेत दाखविण्यात येणार आहेत. प्रयासम ही संयुक्त राष्ट्र बाल निधी (UNICEF) शी संबंधित संस्था आहे. सलीम शेख, मनीष चौधरी, सप्तर्षी रॉय, आणि अविजित मर्जीत अशा तरुणांनी दिग्दर्शित केलेले हे 8 चित्रपट आहेत.

हे सर्वजण दखिंदरी, महिषबठाण, नजरुल पल्ली या ठिकाणचे तरुण आहेत. हा परिसर राजधानी कोलकातामध्येच आहे. हे सर्व प्रसायम व्हिज्युअल बेसिक्सचे विद्यार्थी आहेत. हा आशियामधील असा एकमेव बेसिक फिल्म स्टुडिओ आहे ज्याला Adobe सपोर्ट करते. असे लघुपट मुलांना दाखवून सर्वसमावेशक शिक्षणाचा प्रचार करणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच LGBTQ तरुणांना समाजापासून वेगळे किंवा अवांछित वाटू नये यासाठीचा हा प्रयत्न आहे. (हेही वाचा: Same Sex Marriage: 'भारतात केवळ जैविक पुरुष आणि जैविक स्त्री यांच्यातीलच विवाहाला परवानगी, समलिंगी विवाह मान्य नाही'- केंद्र)

या चित्रपटांमध्ये समलैंगिकतेचे अनेक पैलू दिसणार आहेत. समलैंगिक लोकांच्या भावना, त्यांचे भावविश्व, त्यांना येणाऱ्या समस्या अशा अनेक गोष्टींचे दर्शन यामध्ये घडेल. उदाहरणार्थ, सलीम शेख यांचा 'देखा' हा लघुपट एक बाप आणि त्याच्या समलिंगी मुलाची कथा सांगतो. ‘दक्खिना’मध्ये ‘मेल एस्कॉर्ट'ची कथा मांडली आहे. आशा आहे की हे चित्रपट एलजीबीटीक्यू लोकांप्रती समाजाची मानसिकता बदलण्यासाठी मदत करू शकतील.