RBI | (File Image)

खातेधारकांना छोट्यामोठ्या गोष्टींसाठी खातेधारकांना कार्यालयात चकरा मारायला लावणाऱ्या बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सज्जड इशारा दिला आहे. जर खातेधारकाने आवश्यक ती सर्व कागदपत्रे तपशीलासह जमा केली असतील तर त्यांना छोट्या-मोठ्या कारणांसाठी बँकेत (RBI KYC Diktat To Bank) बोलावू नका. तसेच, खातेधारकाने जर आपल्या पत्त्यात कोणत्याही प्रकारचा बदल केला नसेल तर आपली ओळख (KYC) अपडेट करण्यासाठी त्यांना बँकेच्या कोणत्याही शाखेत जायची आवश्यकता नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

आरबीआयने 6 जानेवारी रोजी काढलेल्या एका सूचनापत्रकात म्हटले आहे की, जर आपल्या केवायसी कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नसेल तर, खातेधारक आपला ईमेल आयडी, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, एटीएम अथवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमातून स्व-घोषणापत्र जमा करु शकतात. (हेही वाचा, Bank Locker New Rules: RBI ने बदलले बँक लॉकरचे नियम; ग्राहकांना 'असा' मिळणार फायदा, वाचा सविस्तर)

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले होते की, केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना बँकेत येण्याचा दबाव टाकता कामा नये. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय बँकेने गुरुवारी काही निर्देश जारी केले आहेत. यात म्हटले आहे की, दिलेल्या कागदपत्रांनुसार केवायसीमध्ये कोणत्याही प्रकारे बदल नसेल तर पुन्हा केवायसी करण्यासाटी बँक ग्राहकांना स्वघोषणापत्राद्वारे अद्यावतीकरण करता येणे शक्य आहे.

केंद्रीय बँकेने दिलेल्या निर्देशामध्ये म्हटले आहे की, नोंदणीकृत इमेल आयडी, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, एटीएम, डिजिटल माध्यम (ऑनलाइन बैंकिंग/इंटरनेट बैंकिंग, मोबाइल एप्लिकेशन) पत्र आदींच्या माध्यमातून स्व-घोषणापत्राची सेवा ग्राहांना देण्यात यावी. ज्यामुळे खातेदार अथवा ग्राहकांना बँक कार्यालयात यावे लागू नये.