Ration Card Update: आता रेशनकार्ड लाभार्थ्यांना मोफत गहू मिळणार नाही; सरकारने जारी केला आदेश
रेशनकार्ड (Photo Credits- Facebook)

Ration Card Update: तुम्ही रेशन कार्ड (Ration Card) लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या रेशन कार्ड संदर्भातील निर्णयाचा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये 19-30 जूनपर्यंत मोफत रेशनचे वाटप केले जाणार आहे. मात्र, यावेळी लाभार्थ्यांना गव्हाऐवजी 5 किलो तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. म्हणजेच, यावेळी तुम्हाला मोफत रेशन अंतर्गत गव्हापासून वंचित राहावे लागेल. या संदर्भात अन्न व रसद विभागाच्या आयुक्तांनी आदेशही जारी केले आहेत.

आतापर्यंत मोफत रेशन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिले जात होते. मात्र, अन्न व रसद विभागाच्या आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार यावेळी लाभार्थ्यांना गव्हाऐवजी केवळ पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यूपीसोबतच अनेक राज्यांमध्ये गव्हाचा कोटा कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. (हेही वाचा -Agnipath Recruitment Scheme: अग्निपथ योजनेला झालेल्या हिंसक आंदोलनाची चौकशी करण्यासाठी SIT ची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल)

गव्हाच्या कमी खरेदीमुळे सरकारने रेशन कोट्यातील गव्हाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दुरुस्ती फक्त प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) साठी करण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गव्हाच्या जागी सुमारे 55 लाख मेट्रिक टन तांदळाचे अतिरिक्त वाटप करण्यात आले आहे.

तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ मिळाला तर तुम्ही पोर्टेबिलिटी चलनाद्वारे तांदूळ घेऊ शकाल. याशिवाय, 30 जून रोजी आधार प्रमाणीकरणाद्वारे अन्नधान्य घेण्यास सक्षम नसलेल्या पात्र व्यक्तींना मोबाईल ओटीपी पडताळणीद्वारे तांदूळ वितरित केले जातील. वितरणाच्या वेळी पारदर्शकतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले नोडल अधिकारी सर्व दुकानांवर उपस्थित राहतील.