EVM मशीनमध्ये घोटाळा? तुमचे मत जर दुसऱ्या पक्षाला गेले, तर ताबडतोब करा या गोष्टी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तिसऱ्या टप्प्यात 13 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील एकूण 117 जागांसाठी मतदान होत आहे. या देशातील सर्वात मोठ्या निवडणुका असल्याने काही घोळ, गैरप्रकार होऊ नये म्हणून निवडणूक आयोग सज्ज आहे. 2014च्या निवडणुकीवेळी इव्हीएम (EVM) मशीनमध्ये घोटाळा झाला असल्याचे अनेक आरोप झाले होते. काही दिवसांपूर्वी सोलापूर येथे प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे या दोघांनीही दुसऱ्या कोणत्याही पक्षाला मत दिल्यास ते भाजपला जात असल्याचा आरोप केला होता. तुमच्याही बाबतील असे घडले तर? या निवडणुकीत प्रत्येक मताला महत्व आहे, त्यामुळे तुमचे मत योग्य पक्षाला जाणे महत्वाचे आहे.

तुमचे मत दुसऱ्या पक्षाला गेले तर त्याबाबत तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकता. मात्र ही तक्रार खोटी ठरली तर तुम्हाला शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे खरच तुमचे मत दुसऱ्या पक्षाला गेले असेल तरच तक्रार करा. सर्वप्रथम मतदान केंद्रावरील अधिकारी तुमच्या तक्रारीची नोंद घेतील. निवडणूक प्रक्रिया थांबवून ही तक्रार नोंदवून घेतली जाईल. (हेही वाचा: मतदान पद्धतीत बदल, प्रत्येक मतदारसंघात पाच ठिकाणी होणार व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी)

त्यानंतर सर्व पक्षाच्या प्रतिनिधींसमोर पुन्हा त्या मतदाराला मतदान करायला सांगितले जाईल. परत ते मत दुसऱ्या पक्षाला गेले तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया थांबवली जाईल. इव्हीएम मशीन खराब असल्याने ते ताबडतोब बदलण्याची व्यवस्था केली जाईल व परत नव्याने मतदानाला सुरुवात होईल. मात्र ते मत जर का योग्य उमेदवाराला गेले तर मात्र त्या मतदाराला पोलिसांच्या हवाली केले जाईल. तक्रार खोटी ठरल्याने मतदाराला 6 महिने शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा होऊ शकेल.