मतमोजणीमध्ये पारदर्शक यावी म्हणून ईव्हीएम (EVM) मशीनची सुरुवात झाली, मात्र मागच्या निवडणुकीवेळी या यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचे आरोप झाले होते. असा प्रकार या निवडणुकीवेळी होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे, आता मतमोजणीवेळी व्हीव्हीपॅट (VVPAT) स्लिपची पडताळणी करावी लागणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे निवडणुकींचे निकाल थोडे लांबण्याची शक्यता आहे. मतदान केल्यानंतर आपण नक्की कोणाला मत दिले याची स्लीप अवघ्या 7 सेकंदामध्ये तयार होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात पाच ठिकाणी अशा प्रकारे पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी देशातील 21 विरोधी पक्षांनी ईव्हीएम यंत्रातील मतांसोबत 50 टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील स्लीपची पडताळणी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता मतांची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोग व्हीव्हीपॅटची संख्यादेखील वाढवणार आहे. (हेही वाचा: लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे ऐवजी सहा दिवसानंतर लावणार? निवडणुक आयोगाचा दावा)
आतापर्यंत निवडणूक आयोगाकडून 4125 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मोजणी केली जात होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 20, 625 ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाणार आहे. देशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार असून, 23 मे ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. परंतु व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी करावी लागणार असल्याने यावेळी लोकसभा निवडणुकीचा निकाल थोडा उशिरा लागू शकतो. दरम्यान या निवडणुका देशातील सर्वात मोठ्या निवडणुका असल्याने मतदानाची विश्वासार्हता महत्वाची आहे. आता या नव्या पद्धतीने होणाऱ्या मतदानाची माहिती मतदार करणाऱ्यानेही समजावून घेतली पाहिजे.