Aadhaar-Pan | (Photo Credits: Archived, edited)

केंद्र सरकार कडून पॅन कार्ड युजर्सना नवा नियम जारी करण्यात आला आहे. यामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही आधार एनरोलमेंट आयडीच्या मदतीने पॅन कार्ड  (PAN Card) घेतले असेल, तर तुम्ही तुमचे आधार कार्ड (Aadhaar Card)  मूळ आधार कार्ड क्रमांकाने बदलले पाहिजे. अन्यथा 31 डिसेंबर 2025 पासून तुमचे पॅन काम करणे थांबवू शकते. दरम्यान हा नियम, सर्व आधार कार्ड यूजर्ससाठी नाही.

आयकर विभागाची माहिती

सरकारी अधिसूचनेनुसार, 1 ऑक्टोबर 2024 पूर्वी आधारसाठी अर्ज करणाऱ्या आणि त्यांच्या नावनोंदणी आयडीवरून पॅनकार्ड मिळवणाऱ्या सर्व पॅनधारकांना आता त्यांचा आधार क्रमांक आयकर विभागाला सांगावा लागेल. 3 एप्रिल 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, अशा सर्व पॅनकार्डधारकांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्यांची माहिती द्यावी लागेल.

दंडातून सूट मिळू शकते

पॅन-आधार लिंकिंगची सध्याची प्रक्रिया पॅन कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी वापरली जाईल. पॅन कार्ड धारकाला आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन पॅन-आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. पण, पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 30 जून 2023 होती आणि आता तसे केल्यास दंड भरावा लागेल. परंतु ज्यांनी एनरोलमेंट आयडीवरून पॅन घेतला त्यांच्याकडे त्यावेळी आधार क्रमांक नव्हता, त्यामुळे असे पॅन कार्ड धारक 2023 च्या अंतिम मुदतीत लिंकिंग करू शकले नाहीत. अशा पॅन कार्डधारकांना दंडातून सूट मिळू शकते.

31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार कार्ड न दिल्यास काय होईल?

आता जर पॅन कार्ड धारकाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत पॅन कार्ड आधार क्रमांकाशी लिंक केले नाही तर 1 जानेवारी 2026 पासून पॅन निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच 1000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

आधार कार्ड पॅनशी कसे लिंक करावे

ई-फायलिंग पोर्टलच्या होम पेजवर जा आणि Quick Links पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला Link Aadhaar या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

पॅन आणि आधार एंटर करा आणि Verify पर्यायावर क्लिक करा.

यानंतर, आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवर एंटर केलेला 6 अंकी OTP टाकावा लागेल आणि Validate वर क्लिक करावे लागेल.