'नागपूर मेट्रो'चे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन; ठरला देशात सर्वात वेगात पूर्ण होणारा प्रकल्प
माझी मेट्रो (Photo Credit : Youtube)

Nagpur: मुंबईनंतर राज्यातील दुसरी मेट्रो, नागपूरची ‘माझी मेट्रो’ (Majhi Metro) चे उदघाटन उद्या, 7 मार्च रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे उदघाटन करणार आहे. हा उद्घाटन सोहळा मेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. 1 वर होणार आहे, तर पहिल्या दिवशी मेट्रो बर्डी ते खापरी दरम्यान धावणार आहे. सीएमआरएसच्या परीक्षणानंतर 5 मार्चला सायंकाळी नागपूर मेट्रोला सुरक्षेचे प्रमाणपत्र मिळाले. या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहबांधणी व नागरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 मार्चला, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत मेट्रोचा नि:शुल्क प्रवास घडणार आहे. त्यानंतर 9 मार्चला बर्डीहून सशुल्क प्रवासाला सुरुवात होईल. मेट्रोचा एक महिन्याचा प्रवास हा सवलतीच्या दरात असणार आहे. खापरी ते सीताबर्डी मार्गावर खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट आणि सीताबर्डी हे पाच स्टेशन खुले राहणार आहे. (हेही वाचा: ट्राफिकला कंटाळून सोनाली कुलकर्णीने केला मेट्रोने प्रवास; असा होता तिचा पहिलावहिला अनुभव)

या प्रकल्पाचे बांधकाम 1 जून 2015 साली सुरु झाले, आणि अवघ्या साडेतीन वर्षांत हा प्रकल्प पूर्णदेखील झाला. 3 मार्चला सीएमआरएसच्या तीन अधिकाऱ्यांनी स्टेशनचे बांधकाम, स्टेशनवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेट, अग्निरोधक उपाय, एस्केलेटर, लिफ्ट, विद्युत उपकरणे, टेलिकॉम, आपात्कालीन यंत्रणा व इतर सर्व सोयीसुविधांची पाहणी केली. त्यानंतर दोनच दिवसात या मेट्रोला सुरक्षेचे प्रमाणपत्रदेखील देण्यात आले. देशात वेगात पूर्ण होणारा प्रकल्प म्हणून याची नोंद झाली आहे.