जल शक्ति मंत्रालयाकडून सर्वश्रेष्ठ स्वच्छ प्रतिष्ठित ठिकाणांची यादी जाहीर, वैष्णो देवी मंदिराने मिळवले पहिले स्थान
वैष्णों देवी (Photo Credits: PTI/File)

जल शक्ति मंत्रालयाने मंगळवारी ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत देशातील सर्वात स्वच्छ ठिकाणांची यादी जाहीर केली. यात जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मधील रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा डोंगरांच्या शीर्षस्थानी वसलेले प्रसिद्ध माता वैष्णो देवी मंदिराला देशातील 'सर्वोत्कृष्ट स्वच्छ प्रतिष्ठित स्थळ' म्हणून घोषित केले गेले आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे पुरस्कार 6 सप्टेंबर रोजी स्वच्छता महोत्सवा दरम्यान सादर करणार आहेत. पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. स्वच्छतेच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर वैष्णो देवीला स्वच्छ ठिकाण म्हणून घोषित केले गेले आहे. (महाराष्ट्र सरकारचे 'मिशन काश्मीर', Luxury Resort बांधण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र मंत्री मंडळाकडून मान्यता)

या अधिकाऱ्याने सांगितले की, मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात, संपूर्ण तीर्थक्षेत्र स्वच्छतेसाठी वर्षानुवर्षे घेतलेल्या बर्‍याच पुढाकारांमुळे मंडळाने आणलेल्या स्वच्छतेत सर्वांगीण सुधारण्याच्या आधारे हे मंदिर निवडले गेले आहेत. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आग्रामधील ताजमहाल, आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिर, पंजाबमधील सुवर्ण मंदिर, वाराणसीतील मणिकर्णिका घाट इत्यादींपासून वैष्णो देवी मंदिराला कडक स्पर्धा होत होती.

या सन्मानाबद्दल माता वैष्णो देवी श्राईन बोर्डाचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बोर्डाच्या सर्व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. यापूर्वी 2017 मध्ये देवस्थानाला पेयजल आणि स्वच्छता क्षेत्रातील विशेष पुरस्कार मिळाला होता. 2017 मध्ये, ते सुवर्ण मंदिरानंतर दुसर्‍या स्थानावर राहिले होते तर 2018 मध्ये, इंडिया टुडे ग्रुपने हे सर्वात स्वच्छ धार्मिक स्थळ म्हणून घोषित केले होते.