करदात्यांना (Taxpayers) दिलासा देत प्राप्तिकर विभागाने सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर परतावा भरण्याची (Income Tax Return) तारीख वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता वैयक्तिक करदात्यांना 10 जानेवारी 2021 पर्यंत रिटर्न भरण्याची संधी आहे. आधीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत होती. कोविड-19 साथीच्या आजारामुळे करदात्यांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेता सरकारने आयकर भरण्याच्या तारखा वाढवल्या आहेत. वैयक्तिक परतावा 10 जानेवारीपर्यंत भरता येणार आहे व सोबत व्यापाऱ्यांसाठी ऑडिट रिटर्नची तारीख 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.
याशिवाय जीएसटी रिटर्न भरण्याची तारीखही वाढविण्यात आली आहे. जीएसटी कायदा 2017 अंतर्गत वार्षिक परतावा भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती, आता ती 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. सीबीडीटीने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ज्या करदात्यांना त्यांच्या रिटर्न्सचे ऑडिट करावे लागत नाही आणि रिटर्न भरण्यासाठी आयटीआर-1 किंवा आयटीआर-4 फॉर्म वापरावा लागेल, त्यांच्यासाठी शेवटची तारीख 10 जानेवारी करण्यात आली आहे. 29 डिसेंबर पर्यंत आर्थिक वर्ष 2019-20 (मूल्यांकन वर्ष 2020-21) साठी 4.54 कोटींपेक्षा जास्त आयकर विवरणपत्र भरले गेले आहे. प्राप्तिकर विभागाने बुधवारी ही माहिती दिली.
मागील आर्थिक वर्षात तुलनात्मक कालावधीपर्यंत 4.77 कोटी आयकर विवरणपत्र भरण्यात आले होते. वित्तीय वर्ष 2018-19 (मूल्यांकन वर्ष 2019-20) च्या शेवटच्या तारखेपर्यंत विना उशिरा शुल्काशिवाय 5.65 कोटी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यात आले. मागील वर्षी आयकर विवरणपत्र भरण्याची तारीख 31 ऑगस्ट 2019 पर्यंत वाढविण्यात आली होती. (हेही वाचा: 7th Pay Commission: 'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि सेवानिवृत्तीच्या वयात होणार वाढ)
आकडेवारीचे विश्लेषण हे दर्शविते की आर्थिक वर्ष 2019-20 साठी वैयक्तिक मिळकत कर परतावा भरणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे, तर कंपन्या व विश्वस्त यांनी दाखल केलेल्या आयकर विवरणपत्रात वाढ झाली आहे.